
आयपीएल 2027 स्पर्धेला अजून दहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना लखनौ सुपर जायंट्सने पहिल्या जेतेपदासाठी आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लखनौ सुपर जायंट्सने विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला ट्रेड डीलच्या माध्यमातून रिलीज केलं आहे. तर दिल्लीकडून कुलदीप यादवला आपल्या संघात घेतलं आहे. ऋषभ पंतला सोडताच लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. रिपोर्टनुसार, लखनौ सुपर जायंट्सचे कर्णधार संजीव गोयंका यांनी कर्णधारपदावर कोण बसणार? याचा निर्णय आधीच करून ठेवला आहे. लखनौ सुपर जायंट्सचं कर्णधारपद संघाचा ओपनर मिचेल मार्शला सोपवली जाऊ शकते. मार्श ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघाचा कर्णधार आहे आणि त्याने कर्णधार म्हणून चांगली कामगिरी बजावली आहे.
मिचेल मार्शसह आणखी एक पर्याय, पण…
लखनौ सुपर जायंट्सकडे मिचेल मार्श शिवाय एक पर्याय आहे. दक्षिण अफ्रिकेचा एडन मार्करम हा देखील उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याच्याकडे कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. पण संघाचे हेड कोच जस्टिन लँगर आणि टीम डायरेक्टर टॉम मूडी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मार्शकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच पुढच्या पर्वात मिचेल मार्श लखनौ सुपर जायंट्सची धुरा सांभाळण्याची शक्यता वाढली आहे. मिचेल मार्शने मागच्या दोन पर्वात लखनौ सुपर जायंट्ससाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याने 23 डावात 1190 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राईक रेटही 163हून अधिक आहे.
ऑस्ट्रेलियन खेळाडूवर दुसऱ्यांदा विश्वास!
लखनौ सुपर जायंट्सने कर्णधारपदाची माळ मिचेल मार्शच्या गळ्यात घातली तर संजीव गोयंका यांच्या संघाचा कर्णधार दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन असेल. यापूर्वी रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका होते. तेव्हा त्यांनी महेंद्रसिंह धोनीच्या जागी स्टीव्ह स्मिथला कर्णधारपद सोपवलं होतं.
ऋषभ पंतने उचललं असं पाऊल
ऋषभ पंतने लखनौ सुपर जायंट्सला सोडून दिल्ली कॅपिटल्स संघात सहभागी होतात एक पाऊल उचललं. त्याने लखनौ सुपर जायंट्स संघाचं सोशल मिडिया पेज अनफॉलो केलं आहे. रिपोर्टनुसार, आयपीएल 2026 स्पर्धेदरम्यान ऋषभ पंतला कर्णधारपद सोडण्यास सांगितलं होतं. दुसरीकडे संघ व्यवस्थापनने साांगितलं की त्याने स्वत:हून कर्णधारपद सोडलं. लखनौ सुपर जायंट्सकडून दिल्ली कॅपिटल्स संघात सहभागी होतात ऋषभ पंतचं 12 कोटींचं नुकसान झालं आहे. त्याला आता 27 कोटींऐवजी 15 कोटी मिळणार आहेत.
Leave a Reply