
आयपीएल 2026 स्पर्धेतून आणखी एक संघ बाद झाला आहे. प्लेऑफच्या एलिमिनेटर फेरीत राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 8 गडी गमवून 243 धावा केल्या. तसेच विजयासाठी 244 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यातील विजयाचा शिल्पकार ठरला तो वैभव सूर्यवंशी.. त्याने 29 चेंडूत 97 धावांची खेळी केली. त्यामुळेच इतकं मोठं आव्हान सनरायझर्स हैदराबाद संघापुढे ठेवता आलं. हे आव्हान काही सनरायझर्स हैदराबादला गाठता आलं नाही. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर हा सामना पूर्णपणे राजस्थान रॉयल्सच्या पारड्यात झुकला होता. शेवटी निकालही तसाच लागला. सनरायझर्स हैदराबाद 196 धावांपर्यंत मजल मारू शकला. सनरायझर्स हैदराबादने हा सामना 47 धावांनी गमावला. या पराभवासह सनरायझर्स हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. या पराभवानंतर कर्णधार पॅट कमिन्स काय चुकलं याचं विश्लेषण केलं.
पराभवानंतर काय म्हणाला पॅट कमिन्स?
आयपीएल 2026 स्पर्धेतील या पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, ‘तो (सूर्यवंशी) खूप चांगला खेळला. खेळपट्टी खरोखरच चांगली होती. अगदी शेवटपर्यंत खेळपट्टी चांगलीच होती. तो एक खूपच अष्टपैलू संघ होता. तरुण खेळाडू, प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या सर्वात तरुण संघांपैकी आम्ही एक होतो. कर्णधार म्हणून हे पाहणे खूप छान वाटते. 240 धावांचा पाठलाग करताना काही गोष्टी योग्य होण्याची गरज होती. आम्ही चुकीच्या वेळी खूप विकेट गमावल्या. आम्ही पहिल्या दोनमध्ये येण्यापासून फक्त एक पाऊल दूर होतो. यापेक्षा जास्त काही मागू शकत नाही.’
राजस्थान रॉयल्सची क्वॉलिफायर 2 मध्ये एन्ट्री
राजस्थान रॉयल्सने या विजयासह क्वॉलिफायर 2 मध्ये एन्ट्री मारली. क्वॉलिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना 29 मे रोजी होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत धडक मारेल. अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आधीच एन्ट्री मारली आहे. त्यामुळे अंतिम फेरीत आरसीबीचा सामना कोणाशी होतो याची उत्सुकता आहे.
Leave a Reply