
रेशनच्या तांदळात दातांची कवळी सापडल्याने धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातल्या जेवळीमध्ये खळबळ उडाली आहे. भातासाठी तांदूळ चाळताना हा धक्कादायक प्रकार समोर आला. ही कवळी नेमकी मानवी आहे की प्राण्याची, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. गावातील महिला भागाबाई बाबुराव बिराजदार यांनी स्वस्त धान्य दुकानातून रेशनचे धान्य घेतले होते. भात बनवण्यासाठी तांदूळ चाळणीत घेतला असता, त्यामध्ये सहा ते सात दातांची कवळी आढळून आली. हे दात काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती आहे. मात्र, ते मानवी आहेत की प्राण्याचे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकारामुळे रेशन व्यवस्थेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. प्रकरणाची चौकशी करून शासकीय पातळीवर तांदळाची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
नेमकी काय घटना घडली?
दरम्यान, झालेला सर्व प्रकार त्यांच्या सुनबाई लक्ष्मी बाळू बिराजदार यांनी सांगितला आहे. त्या म्हणाल्या की, सासूबाईंनी सकाळी रेशन दुकानातून रेशन आणलं, सकाळी साडे दहावाजता त्यांनी रेशन आणलं. मग आम्ही आणलेलं रेशन घरात ठेवलं. मग 4 वाजता शाळेतून माझी मुलगी घरी आली. त्यानंतर खिचडीची तयारी सुरु केली. पण त्यानंतर मी तांदुळ निवडण्यासाठी घ्यायला गेले. तांदूळ आधीच खूप घाण असतात. त्यामुळे दिवसाच्या उजेडातच आम्ही ते निवडतो. तर तांदुळ निवडायला घेतले आणि धक्काच बसला. त्यामध्ये आळ्या, किडे, जाळ्या- अळ्या आणि उंदराच्या लेंड्याही आढळल्या. याशिवाय त्यामध्ये दातांची कवळी आढळून आली. ही कवळी माणसाची आहे की कोणत्या प्राण्याची आहे, हे काही कळत नाही. पण खाण्यालायक हे रेशन नाही. सामान्य लोकांनी हे सर्व धान्य कसं खावं, त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि चांगलं रेशन धान्य पूरवावं, असं त्यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे सध्या आता राज्यामध्ये तुकाराम मुंढे यांच्या एफडीएची धडाकेबाज कारवाईसत्र सुरुच आहे. खाद्यपदार्थांची सुरक्षा ही किती मह्त्वाची आहे, हे अन्न व औषध विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या कारवायांमधून समोर येत आहे. त्यामुळे जेवळीतील या घटनेनंतर याप्रकरणात पुढे काय होणार, याकडे लक्ष आहे.
Leave a Reply