
महाराष्ट्रातील विविध सरकारी सेवांच्या भरती परीक्षा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीमार्फत राज्यातील प्रत्येक महसुली विभागात विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाणार आहे. तसेच शिक्षण संस्थाचालक आणि संबंधित घटकांची मते जाणून घेऊन त्याआधारे राज्यासाठी समग्र धोरण तयार केले जाणार आहे.
वर्षा निवासस्थानी झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही बैठकीला उपस्थित होते. समितीच्या अध्यक्षपदी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा असतील. पोलिस महासंचालक सदानंद दाते, माहिती-तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी आणि नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांचा समितीत समावेश आहे.
पेपरफूट आणि परीक्षा गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्राचा कायदा राज्यात लागू करण्याची तयारी आहे. विद्यार्थ्यांसाठी 25 हजार सुरक्षित क्लासरूम उभारण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
Leave a Reply