
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून, या निकालाने सर्वांनाच धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांचा पराभव झाला असून, स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे.
मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यांच्या निधनानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या एका गटाकडून आणि देशमुख कुटुंबाकडून करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना बिनविरोध संधी देऊन त्यांना श्रद्धांजली द्यावी, अशी भावना व्यक्त केली जात होती. मात्र, स्वरूपानंद देशमुख यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवत अर्ज मागे घेण्यास नकार दिला. अखेर झालेल्या मतदानात त्यांनी निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला. या निकालामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, सहानुभूतीची लाट अश्विनी देशमुख यांच्या बाजूने जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र मतदारांनी वेगळा कौल देत विकास किंवा इतर मुद्द्यांना प्राधान्य दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विजयानंतर स्वरूपानंद देशमुख यांच्या समर्थकांनी गावात जल्लोष साजरा केला.
Leave a Reply