
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला आज पैठण येथून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. यंदा संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ४२७ वे वर्ष असून, हजारो वारकरी आणि भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे.
सकाळपासूनच पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रशासन आणि मंदिर समितीकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. पालखी मार्गावर आवश्यक सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि वारकऱ्यांसाठी विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यंदाच्या वारीत संत एकनाथ महाराजांची पालखी तब्बल २८५ किलोमीटरचा प्रवास करत १८ दिवसांनंतर पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचणार आहे. लहानांपासून ज्येष्ठ वारकऱ्यांपर्यंत हजारो भाविकांनी या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला असून, संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला आहे.
“विठ्ठल… विठ्ठल…, संत एकनाथ महाराज की जय, संत भानुदास महाराज की जय” अशा जयघोषांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि अभंगांच्या सुरावटीत वारकरी विठुरायाच्या भेटीच्या ओढीने पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.
दरम्यान, प्रशासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना केल्या असून, पालखी मार्गावर पोलीस बंदोबस्त, आरोग्य पथके आणि आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आल्या आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.
Leave a Reply