
बॉलिवूडमध्ये काही नाती ही रक्ताची नसली तरी काळाच्या ओघात ती तितकीच घट्ट होतात. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता सोनू सूद यांचं नातं याचं उत्तम उदाहरण आहे. दोघांनी 2008 मध्ये आलेल्या ‘जोधा अकबर’ या सिनेमात भाऊ-बहिणीची भूमिका साकारली होती.
विशेष म्हणजे, या ऑनस्क्रीन नात्याचं रूपांतर खऱ्या आयुष्यातही भाऊ-बहिणीच्या नात्यात झालं. आजही ऐश्वर्या सोनूला राखी बांधते. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘जोधा अकबर’मध्ये हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत होते. ऐश्वर्याने जोधाची भूमिका साकारली होती, तर सोनू सूदने तिच्या भावाची म्हणजेच सुजामलची भूमिका केली होती.
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली आणि त्यानंतर त्यांचं नातं भाऊ-बहिणीचं झालं. ‘जोधा अकबर’च्या शूटिंगदरम्यानच ऐश्वर्याने सोनूला पहिल्यांदा राखी बांधली होती, असं म्हटलं जातं. त्यानंतर हे नातं पुढेही कायम राहिलं आणि रक्षाबंधनाच्या दिवशी ऐश्वर्या सोनूला राखी बांधत असल्याचं सांगितलं जातं.
सोनू सूदने एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्यासोबतच्या या खास नात्याचा किस्सा सांगितला होता. त्याने सांगितलं होतं की, ‘जोधा अकबर’च्या सुरुवातीच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या काहीशी शांत आणि राखीव स्वभावाची होती. मात्र एका सीनच्या शूटिंगदरम्यान तिने अचानक सोनूला सांगितलं की, “तुम्ही मला पप्पांची (अमिताभ बच्चन) आठवण करून देता.”
या घटनेनंतर दोघांमध्ये आणखी आपुलकी निर्माण झाली. सोनूने सांगितलं होतं की ऐश्वर्या आजही त्याला ‘भाई साहब’ म्हणून हाक मारते. सोनू सूदचा बच्चन कुटुंबाशी केवळ ऐश्वर्यामुळेच संबंध नाही. त्याने अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, तर अभिषेक बच्चनसोबत ‘युवा’ आणि 'हॅप्पी न्यू ईयर'मध्ये काम केलं आहे. त्यामुळे बच्चन कुटुंबासोबत सोनूचं एक वेगळं आणि जिव्हाळ्याचं नातं असल्याचं त्याने स्वतःही सांगितलं आहे.





Leave a Reply