
कॉकरोच जनता पार्टीसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आपल्या विशेष पॉवरचा वापर करून सीजेपी आंदोलनातील आंदोलकांवर देशभरात दाखल झालेले एफआयआर रद्द करण्याचा आदेश दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयाने सीजेपीच्या आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल महिन्याभरानंतर सीजेपीची ही मागणी मान्य झाली आहे. सरकार चालढकल करत असल्याने कोर्टाची धाव घेण्यात आली होती. आता कोर्टाच्या या निर्णयावर सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा विजय तुमच्या सर्वांचा आहे. तुम्ही आवाज उठवला नसता तर आज आपण जिंकलो नसतो. हा विजय संपूर्ण भारतीयांचा आहे, असं अभिजीत दीपके यांनी म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अभिजीत दीपके यांनी मीडियाशी संवाद साधला. आज खऱ्या अर्थाने आमच्या लढ्याला यश मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आंदोलनासह देशभरात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच बरोबर नीटॉमधील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भरपाई देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. न्याय मिळण्यासाठी एक महिना लागला. मात्र अखेर न्याय मिळाला. त्यामुळे 5 सप्टेंबर रोजी असलेले आंदोलन रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले.
सरकार चालढकल करत होतं
गेल्या एक महिन्यांपासून आमच्या दोन मागण्यांसाठी आम्ही लढा देत होतो. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी या आमच्या प्रमुख मागण्या होत्या. मात्र सरकार कुठेतरी त्या मान्य करत नव्हतं, आज न्यायालयाने आम्हाला न्याय दिला. जंतरमंतर येथे आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा लागला. आंदोलनाला एक यश आले. त्यात आज न्यायालयाने दिलेल्या निकालाने आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश मिळाले, अशी भावना दीपके यांनी व्यक्त केली.
न्याय मिळाला
या निर्णयाने आम्ही सर्वच समाधानी आहोत. एका पद्धतीने आम्हाला न्याय मिळाला आहे. मागील काही दिवसात अनेक बैठक घेण्यात आल्या. दिल्लीचे आमचे सहकारी संभाजीनगर येथे आले होते आणि आम्ही अनेक विषयांवर चर्चा करून न्याय मिळवण्यात यशस्वी झालो, अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली.
त्या कुटुंबांशी संवाद
अभिजीत यांनी कोर्टाच्या निर्णयानंतर आत्महत्याग्रस्त कुटुंबियांशी संवाद साधून मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही, मात्र त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याच्या प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
Leave a Reply