
बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड, अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे सोशल मीडियासह इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. अशीच एक हॉलिवूड अभिनेत्री जी आज तिचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. ही अभिनेत्री म्हणजे जेनिफर लोपेझ. चित्रपटांसह जेनिफर लोपेझ तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील प्रचंड चर्चेत असते. नुकताच तिचा नेटफ्लिक्सवरील नवीन चित्रपट ‘ऑफिस रोमांस’ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात जेनिफर एका यशस्वी महिलेच्या भूमिकेत दिसत आहे. ज्यामध्ये तिची वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमध्ये जे सुरु आहे तेच या चित्रपटात असल्यामुळे प्रेक्षकांना तो चित्रपट पसंत पडत आहे.
कोट्यवधींची संपत्ती
जेनिफर लोपेझ केवळ अभिनेत्री नाही तर ती एक यशस्वी गायिका, निर्माती, नृत्यांगना आणि व्यावसायिकही आहे. अनेक वर्षांच्या कारकिर्दीत तिने संगीत, चित्रपट, फॅशन आणि व्यवसाय या क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवले आहे. विविध माध्यमांतील अहवालांनुसार, तिची एकूण संपत्ती सुमारे 3500 कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ती जगातील सर्वाधिक श्रीमंत आणि यशस्वी महिला कलाकारांपैकी एक मानली जाते.
वैयक्तिक आयुष्यही कायम चर्चेत
जेनिफर लोपेझच्या व्यावसायिक यशाइतकीच तिच्या वैयक्तिक आयुष्याचीही नेहमी चर्चा झाली आहे. तिने आतापर्यंत चार विवाह केले आहेत. तिचा पहिला विवाह 1997 मध्ये ओजानी नोआ यांच्यासोबत झाला होता. मात्र हे नाते फार काळ टिकले नाही आणि वर्षभरातच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
यानंतर 2001 मध्ये नृत्यदिग्दर्शक क्रिस जुड यांच्याशी तिने दुसरा विवाह केला. मात्र हे वैवाहिक आयुष्यही अल्पकाळ टिकले आणि 2002 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 2004 मध्ये प्रसिद्ध गायक मार्क अँथनी यांच्याशी तिने तिसरा विवाह केला. या विवाहातून तिला जुळी मुले – मॅक्स आणि एम्मे झाली. जवळपास दहा वर्षे एकत्र संसार केल्यानंतर 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
यानंतर अनेक वर्षांनी जेनिफरने 2022 मध्ये अभिनेता बेन अॅफ्लेक यांच्याशी विवाह केला. मात्र हे नातेही फार काळ टिकले नाही आणि 2024 मध्ये दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.
अनेक हाय-प्रोफाइल रिलेशनशिपचीही चर्चा
विवाहांव्यतिरिक्त जेनिफर लोपेझच्या अनेक हाय-प्रोफाइल रिलेशनशिपचीही माध्यमांमध्ये चर्चा झाली. तिचे नाव शॉन ‘डिडी’ कॉम्ब्स, अॅलेक्स रॉड्रिग्ज, कॅस्पर स्मार्ट आणि ड्रेक यांच्यासोबत जोडले गेले होते. मात्र या नात्यांमध्ये अपयश आले तरी तिने आपल्या करिअरवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. उलट अभिनय, संगीत आणि व्यावसायिक क्षेत्रात तिने सातत्याने यश मिळवत स्वतःची वेगळी ओळख कायम राखली.
Leave a Reply