
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक चित्रपटांमधील गाणी आजही चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. असंच एक गाणं जे बेडरुममधील रोमँटिक प्रसंगावर शूट करण्यात आलं आहे. आजही हे गाणं प्रचंड सुपरहिट आहे.
1996 साली प्रदर्शित झालेला 'जीत' हा सनी देओल, सलमान खान, करिश्मा कपूर, अमरीश पुरी आणि आलोक नाथ यांच्या प्रमुख भूमिका असलेला सुपरहिट चित्रपट ठरला. सुमारे 6 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 30 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती.
दरम्यान, गीतकार समीर अंजान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटातील लोकप्रिय गाणे 'अभी सांस लेने की फुर्सत नहीं है…' याबाबत एक रंजक आठवण सांगितली. त्यांच्या मते, हे गाणे नवविवाहित जोडप्याच्या सुहागरातच्या खासगी आणि भावनिक क्षणांसाठी लिहिले गेले होते.
मात्र, प्रत्यक्षात हे गाणे स्वित्झर्लंडमधील निसर्गरम्य ठिकाणी चित्रित करण्यात आले. समीर यांनी सांगितले की, त्या वेळी दिग्दर्शक राज कंवर स्वित्झर्लंडमध्ये शूटिंग करत होते. दुसरे कोणतेही गाणे उपलब्ध नसल्याने त्यांनी हेच गाणे खुल्या लोकेशनवर चित्रीत करण्याचा निर्णय घेतला.
गाणे पाहिल्यानंतर समीर यांना आश्चर्य वाटले, कारण ज्या गाण्याची कल्पना बंद खोलीतील रोमँटिक वातावरणासाठी केली होती, त्यात नायक-नायिका वेगवेगळ्या डोंगर-दऱ्यांमध्ये दिसत होते. त्यामुळे गाण्याचा मूळ भाव आणि गहिरेपणा कमी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र, हे गाणं आजही सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक मानले जाते.




Leave a Reply