
विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आवश्यक असलेली मनुष्यशक्ती आणि धनशक्ती भारतात आहे. मात्र, या शक्तीचे महत्त्व ओळखून ती राष्ट्रदेवाच्या चरणी समर्पित करण्याची भावना आपल्यामध्ये जागृत करणे आवश्यक आहे. आज लक्ष्मीबाई केळकर (मौसीजी) यांच्या जयंतीनिमित्त, म्हणजेच संकल्प दिनाच्या निमित्ताने, गेल्या ९० वर्षांपासून सुरू असलेल्या समितीच्या कार्यरूपी स्त्रीशक्ती जागरणाचे कार्य अखंडितपणे पुढे सुरू ठेवण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे, असं प्रतिपादन सीता गायत्री यांनी केलं. राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी मंडळाच्या पहिल्या अर्धवार्षिक बैठकीत प्रमुख कार्यवाहिका सीता गायत्री बोलत होत्या.
आज लक्ष्मीबाई केळकर (मौसीजी) यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्र सेविका समितीने विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी समितीच्या प्रमुख कार्यवाहिका सीता गायत्री बोलत होत्या. इराणमध्ये वैद्यकीय मदत घेऊन पोहोचलेले भारतीय विमान हे ‘वसुधैव कुटुंबकम्’चे प्रत्यक्ष उदाहरण आहे. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताने मिळवलेले सुवर्णपदक आणि ICC महिला T20 विश्वचषकात भारताचा शानदार विजय, हे विविध क्षेत्रांमध्ये वाढत असलेल्या भारताच्या प्रभावाचे निदर्शक आहेत. २४ जुलै २०२६ पासून तीन दिवस चालणारी ही बैठक वंदनीया प्रमुख संचालिका मा. शांताकुमारीजी तसेच प्रमुख कार्यवाहिका मा. सीता गायत्रीजी यांच्या उपस्थितीत माधव स्मृती परिसर, समालखा, हरियाणा येथे सुरू झाली, असं सीजा गायत्री म्हणाल्या.
दीपप्रज्वलनानंतर राष्ट्र सेविका समितीच्या दिवंगत माजी अखिल भारतीय सहकार्यवाहिका माननीया रुक्मणी अक्का जी आणि रेखाताई राजे यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठकीची सुरुवात झाली. यासोबतच समितीच्या इतर दिवंगत कार्यकर्त्या, ज्येष्ठ नागरिक आशाजी भोसले, सुमन कल्याणपूर, एस. जानकीजी आदी तसेच दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेले देशबांधव, लष्करातील जवान आणि दुर्घटना तसेच नैसर्गिक आपत्तींमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींनाही प्रतिनिधींनी श्रद्धांजली अर्पण केली. समितीच्या या बैठकीत ३८ प्रांतांमधून सुमारे ५०० प्रतिनिधी सेविका सहभागी झाल्याच्या अंदाज आहे.
आज सकाळच्या उद्घाटन सत्रात प्रमुख कार्यवाहिका माननीया सीता गायत्रीजी यांनी समितीच्या कार्याचा आढावा सादर करण्यासोबतच शिक्षण वर्गांचाही आढावा घेतला. समितीच्या शाखांची संख्या, मिलन केंद्रे, शाखायुक्त जिल्हे आणि सेवा कार्यामध्ये वाढ झाली आहे. २८६६ ठिकाणी सेवा कार्य सुरू आहे. सेवा कार्य शिक्षण, संस्कार, स्वावलंबन आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये विविध प्रकल्पांच्या माध्यमातून केले जाते. तसेच योग केंद्रेही चालवली जात आहेत. दुर्गम भागातील मुलींसाठी वसतिगृहे चालवली जात आहेत. २०२६ मध्ये देशभरातील विविध ठिकाणी २५० वर्ग आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये सुमारे १५,२४१ सेविकांनी प्रशिक्षण घेतले.
यावर्षी बंगालमध्ये दीर्घ कालावधीनंतर समितीच्या सेविकांनी पथसंचलनाचे आयोजन केले. जम्मू येथील शिक्षण वर्गात मुसळधार पाऊस आणि वादळाच्या परिस्थितीतही सेविका मैदानात ठामपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी अदम्य धैर्याचे दर्शन घडवले. वंदनीया प्रमुख संचालिकाजी यांच्या छत्तीसगड प्रांताच्या प्रवासादरम्यान त्यांनी सुमारे २५ विविध समुदायांतील महिलांसोबत सामाजिक समरसता बैठकीत सहभाग घेतला.
जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय विद्वत परिषदेसोबत राष्ट्र सेविका समितीने दिल्लीतील विज्ञान भवन येथे ‘नारी से नारायणी’ या नावाने एका संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनात देशभरातून १५०० हून अधिक महिला सहभागी झाल्या. या कार्यक्रमाच्या समारोपावेळी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मार्गदर्शन केले. समालखा येथे सुरू असलेल्या या बैठकीला समितीच्या विविध स्तरांवरील पदाधिकारी उपस्थित आहेत. बैठकीचा समारोप २६ जुलै रोजी होणार आहे.





Leave a Reply