
जे लोक समाजासाठी लढतात. आंदोलन करतात. लोकांसाठी आवाज उठवतात. तुरुंगात असताना त्यांच्या जेवणात विष मिसळले जाण्याची शक्यता असते. मीच नाही. अनेक लोक तुरुंगात असतात. त्यांच्या खाण्यापिण्यात हे लोक गडबड करू शकतात हा सर्वांना डाऊट आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ही शंका व्यक्त करून मला अलर्ट केलं आहे. त्यांनी मला एक टॉक्सिक टेस्ट करायला सांगितली आहे. मी ती टेस्ट करणार आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.
खासदार संजय राऊत काल कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी तुरुंगातून आल्यानंतर मला कॅन्सर झाल्याचं म्हटलं होतं. त्यावर, तुमच्यावर तुरुंगात विषप्रयोग झाला का? असा सवाल राऊत यांना करण्यात आला असता त्यांनी थेट उत्तर दिलं. राहुल गांधींनीही याबाबत संशय व्यक्त केला आहे. 10 दिवसापूर्वी मी राहुल गांधींना भेटलो होतो. तेव्हा त्यांनी शंका व्यक्त करून मला टॉक्सिक टेस्ट करायला सांगितली. ही टेस्ट करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. तुमच्या सारख्या माणसाला आजार व्हावा हे अनाकलनीय आहे. त्यामुळे तुम्ही तात्काळ टेस्ट करून घ्या, असं राहुल गांधी म्हणाले, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
सरकार क्रूर असतं
सरकार क्रूर असतं. तुरुंगात असताना ते काहीही करू शकतं. काही प्रमुख नेत्यांशी मी चर्चा केली. तुरुंगात असताना प्रकृती खालावलेल्या नेत्यांशीही चर्चा केली. त्यावेळी ही गोष्ट लक्षात आली. या आधी मी त्याकडे लक्ष दिलं नव्हतं. तुरुंगात असताना जेवणात विष मिसळलं जाण्याची शक्यता असते. मी तुरुंगातून आल्यावरच हा आजार सुरू झाला, असं राऊत म्हणाले.
Leave a Reply