
पुण्यात डीजे बंदीच्या मागणीवरून दोन गट पडले आहेत. गणेश मंडळातील तरुणांकडून डीजे सुरू राहावा, अशी मागणी केली जात आहे. तर विद्यानंद बापट यांच्यासहित इतर पुणेकरांकडून डीजेला विरोध केला जात आहे. यावरून पुण्यात चांगलाच वाद पेटला आहे. अशातच डीजेच्या विरोधात आवाज उचलणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. बापट हे टीव्ही9 शी बोलत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. या प्रकरणावर पुणे पोलिसांची प्रतिक्रिया समोर आली आहे .
विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यातील एका तरुणाने हल्ला केला. मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या, पुणेकरांबद्दल तुला कोणी…असं म्हणत बापट यांच्यावर हल्ला केला. बापट यांच्यावर हल्ला झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेवर पुणे पोलिसांनी प्रतिक्रिया देत कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. पुणे पोलीस म्हणाले, ‘आरोपीने मारहाण का केली, याची माहिती घेणार. व्हिडिओमध्ये एक तरुण मारहाण करताना दिसत आहे. या घटनेची माहिती घेऊन कारवाई केली जाईल’. बापट यांना मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी सुरक्षितरित्या विद्यानंद बापट यांना वाहनातून पोलीस स्टेशनला नेले. परंतु हल्लेखोर तरुण कोण आहे, याची माहिती पोलीस तपासानंतरच समोर येईल.
Leave a Reply