
साऊथ सुपरस्टार थलपती विजयने राजकारणात प्रवेश केला आहे. आगामी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी त्याने त्याच्या तमिलगा वेत्री कजगमचा (टीव्हीके) जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहिरनाम्यात अनेक कल्याणकारी योजना, तंत्रज्ञानावर आधारित शासन आणि विविध क्षेत्रांमधील सुधारणांचा समावेश आहे. थेट आर्थिक सहाय्य योजना आणि दीर्घकालीन विकास योजना यांचं मिश्रण या जाहिरनाम्यात पहायला मिळत. यातील काही महत्त्वाच्या गोष्टींनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आधी मध्यप्रदेशात आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला राज्य सरकारकडून आर्थिक मदत दिली जाऊ लागली. या योजनेचा निवडणुकीच मोठा फायदा झाल्याचंही पाहायला मिळालं. त्याच धर्तीवर आता विजयच्या पक्षानेही जाहिरनाम्यात अशाच पद्धतीची योजना सुरू करण्याचं आश्वासन दिलं आहे.
प्रमुख कल्याणकारी आश्वासनांमध्ये गृहिणींना दरमहा 2500 रुपये देण्याचा समावेश आहे. यासोबतच पदवीधारांना 4000 रुपये आणि डिप्लोमा धारकांना 2500 रुपये बेरोजगारी भत्ता देण्याचं आश्वासन आहे. इंटर्नशिपसाठी 5000 ते 8000 रुपयांचं विद्यावेतन दिलं जाईल, असंही त्यात सांगण्यात आलं आहे. तर पाच लाख तरुणांसाठी 18000 रुपयांची रोजगार संबंधित सहाय्यता योजनाही प्रस्तावित आहे.
View this post on Instagram
ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि अपंग व्यक्तींना दरमहा 3000 रुपये दिले जातील आणि पेन्शन योजनेची व्याप्ती 15 लाख लोकांपर्यंत वाढवली जाईल. या जाहिरनाम्यात महिलांसाठीच्या विशेष योजनांचाही उल्लेख आहे. पाच लाख रुपयांपर्यंतच बिनव्याजी कर्ज आणि गरीब वधूंना एक तोळा सोनं, रेशमी साड्या देण्याच्या योजनेचा समावेश आहे. मूलभूत सुविधांअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 200 युनिट मोफत वीज, नळाद्वारे पिण्याचं पाणी आणि सहा मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. मजुरांसाठी, अंगणवाडी सेविकांना 18000 रुपये, स्वच्छता कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये देण्याचा प्रस्ताव आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत थलपती विजयचा तगडा चाहतावर्ग आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. त्याच्या सभांना, रॅलींना लोकांची तुफान गर्दी पहायला मिळतोय. विजयने 2024 मध्ये त्याच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. राजकारणात सक्रिय होण्याच्या उद्देशाने विजयने चित्रपटसृष्टीलाही रामराम केला आहे. त्याचा ‘जन नायकन’ हा चित्रपट करिअरमधील शेवटचा चित्रपट असेल.
Leave a Reply