
आजच्या काळात अनेक महिला करिअर आणि वैयक्तिक ओळखीच्या कारणांमुळे लग्नानंतरही आपले मूळ नाव कायम ठेवण्याला प्राधान्य देत आहेत. पण अनेकदा लग्नानंतर सरकारी कागदपत्रे, बँक खाती आणि वैयक्तिक ओळखपत्रांमध्ये नाव बदलण्यासाठी महिलांवर दबाव असतो.
व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा करिअरमध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या महिलांसाठी नाव बदलणे ही एक कठीण आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. या पार्श्वभूमीवर अनेकदा महिलांना लग्नानंतर नाव बदलणे अनिवार्य आहे का? असा प्रश्न पडतो. मात्र, भारतीय कायद्यानुसार हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे.
भारतीय कायद्यात लग्नानंतर महिलांना त्यांचे नाव बदलणे बंधनकारक असल्याचे कोणतेही कलम नाही. विवाह नोंदणी कायदा किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक कायद्यांमध्ये पतीचे आडनाव स्वीकारणे अनिवार्य नाही. भारतीय संविधानाच्या कलम २१ अंतर्गत प्रत्येक नागरिकाला जगण्याचा आणि स्वतःची ओळख जपण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. त्यामुळे आपली मूळ ओळख कायम ठेवणे हा महिलेचा घटनात्मक अधिकार आहे.
आजच्या युगात अनेक महिला लग्नापूर्वीच शिक्षण किंवा नोकरीच्या क्षेत्रात प्रसिद्ध असतात. त्यांचे शैक्षणिक प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि इतर व्यावसायिक रेकॉर्ड्स त्यांच्या मूळ नावावर असतात. अशा वेळी नाव बदलल्यास त्यांना अनेक कायदेशीर आणि तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. या व्यावहारिकता लक्षात घेता, अनेक महिला लग्नानंतरही आपले माहेरचे नाव कायम ठेवण्याला पसंती देत आहेत.
जर एखाद्या महिलेला स्वेच्छेने आपले नाव बदलायचे असेल, तर ती प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर मार्गाने करता येते. राजपत्र अधिसूचना हे नाव बदलण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. सरकारी गॅझेटमध्ये नाव बदलल्याची प्रसिद्धी देणे अनिवार्य मानले जाते.
आधार कार्ड आणि पॅन कार्डला गॅझेटची प्रत जोडून तुम्ही आधार, पॅन आणि पासपोर्टमध्ये नाव बदलू शकता. एकदा सरकारी ओळखपत्रात नाव बदलले की, तुम्ही बँक खाती, विमा पॉलिसी आणि इतर संस्थांमध्ये बदल करु शकता. विविध न्यायालयांनी आपल्या निकालांमध्ये स्पष्ट केले आहे की, लग्नानंतर महिलेची ओळख नष्ट होत नाही. पतीचे नाव लावणे किंवा न लावणे ही पूर्णपणे वैयक्तिक बाब आहे.





Leave a Reply