
दूरदर्शनवरील रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेने भारतीय प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. या मालिकेतील राम, सीता, लक्ष्मण यांच्याबरोबरच शूर्पणखा ही भूमिकाही प्रचंड गाजली होती. ही भूमिका अभिनेत्री रेणू धारीवाल यांनी साकारली होती.
रेणू धारीवाल या पंजाबी कुटुंबातील असून त्यांच्या घरात अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. मात्र अभिनयाची आवड असल्याने त्यांनी आईच्या पाठिंब्याने घरच्यांना न सांगता मुंबई गाठली. येथे त्यांनी प्रसिद्ध अभिनय प्रशिक्षक रोशन तनेजा यांच्या अभिनय वर्गात प्रवेश घेतला.
विशेष म्हणजे त्याच बॅचमध्ये अभिनेता गोविंदाही शिकत होता. अभिनयाचे शिक्षण घेत असताना रेणू यांनी रंगभूमीवरही काम केले. 'पुरुष' या नाटकातील त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे रामानंद सागर यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले आणि त्यांनी 'रामायण'मधील शूर्पणखेच्या भूमिकेसाठी त्यांची निवड केली.
या भूमिकेसाठी त्यांनी सुमारे दोन महिने मेहनत घेतली होती. नकारात्मक पात्र असूनही त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. या भूमिकेसाठी त्यांना त्या काळात 30 हजार रुपये मानधन मिळाले होते.
काही वर्षांनंतर त्यांनी अभिनय क्षेत्राला अलविदा करत विवाह केला. सध्या त्या आपल्या पतीसोबत रिअल इस्टेट व्यवसाय सांभाळत असून कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय पाहतात. याशिवाय त्यांनी राजकारणातही सक्रिय सहभाग घेतला आहे.




Leave a Reply