
भाजपाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्या मतदार यादीतील नावावरून पंजाबमध्ये राजकीय वाद निर्माण झाला आहे. पंजाबमध्ये सुरू असलेल्या SIR प्रक्रियेदरम्यान चड्ढा यांचे नाव मसुदा मतदार यादीतून हटवण्यात आले आहे. यावरून त्यांनी पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, आम आदमी पक्षाने हे आरोप फेटाळून लावत पलटवार केला आहे. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर राघव चड्ढा यांची राज्यसभा सदस्यता धोक्यात येणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पंजाबमध्ये सुरू असलेल्या SIR प्रक्रियेअंतर्गत 13 ऑगस्ट रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत राघव चड्ढा यांचे नाव ‘अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंदणी’ या श्रेणीत टाकण्यात आले आहे. त्यांच्या नावासमोर कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रक्रियेत पंजाबमधील सुमारे 20.66 लाख म्हणजेच जवळपास 9.7 टक्के मतदारांची नावे मसुदा यादीतून वगळण्यात आली आहेत.
राघव चड्ढा यांचा AAP वर आरोप
पंजाबमधून राज्यसभेवर खासदार असलेल्या राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आम आदमी पक्षाच्या सरकारसह प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पंजाब सरकारचे पोलीस आणि प्रशासन आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. चड्ढा यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा हवाला देत सांगितले की, लोकप्रतिनिधींसाठी संरक्षित यादीची तरतूद असते. त्यामुळे दावे आणि हरकतींच्या प्रक्रियेदरम्यान त्यांचे नाव मसुदा मतदार यादीत कायम राहणे अपेक्षित असते. मात्र, त्यांच्या बाबतीत या नियमाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. चड्ढा यांनी स्पष्ट केले की, ही केवळ मसुदा मतदार यादी आहे. त्यामुळे ते निवडणूक आयोगाकडे आपली हरकत नोंदवून अंतिम यादीत आपले नाव पुन्हा समाविष्ट करून घेतील.
आम आदमी पक्षाचा पलटवार
आम आदमी पक्षाने राघव चड्ढा यांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. SIR प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येते, राज्य सरकारच्या नाही, असे AAP ने स्पष्ट केले. कोणाचे नाव मतदार यादीतून वगळायचे किंवा कोणाचे नाव समाविष्ट करायचे, हा निर्णय राज्य सरकार घेत नाही, असेही पक्षाने म्हटले आहे. आपच्या प्रवक्त्याने दावा केला की, निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राघव चड्ढा दिल्लीतील राजेंद्र नगर मतदारसंघात बॅकडेटेड प्रक्रियेद्वारे आपले नाव पुन्हा मतदार यादीत नोंदवण्याचा प्रयत्न करत आहेत. या कथित बेकायदेशीर प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही पक्षाने केली आहे.
AAP च्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक नोंदींनुसार राघव चड्ढा आता पंजाबऐवजी दिल्लीमध्ये राहत आहेत. त्यांनी आपले राहण्याचे ठिकाण बदलले असेल, तर मतदार नोंदणी दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करण्याची जबाबदारी त्यांची स्वतःची होती. त्यामुळे यासाठी पंजाब सरकारला दोष देता येणार नाही, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे.
राज्यसभा खासदारकीवर प्रश्नचिन्ह?
या वादादरम्यान आम आदमी पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी राघव चड्ढा यांच्या राज्यसभा सदस्यत्वाबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे. जर चड्ढा यांचे नाव कोणत्याही मतदार यादीत नसेल, तर त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वावरही परिणाम होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 मधील कलम 3 नुसार राज्यसभा निवडणुकीत उमेदवार होण्यासाठी भारतातील कोणत्याही संसदीय मतदारसंघाचा मतदार असणे आवश्यक आहे. 2003 मधील दुरुस्तीनंतर मात्र ज्या राज्यातून राज्यसभा निवडणूक लढवली जात आहे, त्याच राज्याचा मतदार असणे बंधनकारक राहिलेले नाही. मात्र, संसद सदस्य म्हणून कायम राहण्यासाठी देशातील कोणत्यातरी मतदारसंघात वैध मतदार म्हणून नोंद असणे आवश्यक असल्याचे मानले जाते. त्यामुळे राघव चड्ढा यांचे नाव अंतिम मतदार यादीत राहते की नाही, याकडे आता राजकीय आणि कायदेशीर वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply