
मुंबई लोकलमधील गर्दी, वाढत्या गुन्ह्यांचा प्रश्न एकदा ऐरणीवर आला आहे. लोकल ट्रेनमध्ये मागील 6 महिन्यांत दुसर्यांदा हत्येचा थरार घडला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये 22 वर्षीय मयंक लोहारच्या हत्येने सर्वत्र खळबळ माजली आहे. प्रकरणी पोलिसांनी 24 तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मयंकच्या हत्येनेतर त्यांच्या कुटुंबियांनी आरोपीला फाशीची कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
पश्चिम रेल्वेवर मंगळवारी रात्री 10.50 वाजता चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोक ट्रेनमध्ये रक्तरंजित थरार घडला. ट्रेन ही अंधेरी आणि बोरिवली स्टेशनदरम्यान धावत असताना फर्स्ट क्लास डब्यात हा धक्कादायक प्रकार घडला. ट्रेनच्या डब्यात पावसाचं पाणी येत होते, त्यामुळे लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला. या किरकोळ वादानंतर आरोपी रोशन सुवर्णाने बॅगेतील चाकू काढत मयंकच्या छाती आणि पोटावर सपासप वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात मयांक गंभीर जखमी झाला. तर पुढील काही क्षणात आरोपी रोशन धावत्या ट्रेनमधून उडी मारून फरार झाला.
ट्रेन बोरिवली स्टेशनला पोहोचल्यानंतर रेल्वेचे अधिकारी, जीआरपी आणि आरपीएफ संबंधित डब्यात पोहोचले. मयंकला तातडीने मेडिकल रुममध्ये दाखल केले. त्यानंतर जवळील रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी मयंकला मृत घोषित केले. लोकल ट्रेनमधील हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हत्येच्या घटनेनंतर अनेकांकडून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी ७ विशेष पथकांची स्थापना केली होती. आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी बोरिवली, अंधेरी, मीरा रोड आणि नालासोपारा स्टेशनवरील ४०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. आरोपी रोशन सुवर्णा हा मीरा रोडच्या पूर्व भागात वास्तव्यास होता. त्याला बुधवारी पनवेलमधून अटक करण्यात आली. मयंकच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. मयंकची बहिणीने कारवाईची मागणी करताना म्हटलं की, आमच्या कुटुंबाचं सर्वस्व हिरावलं असून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी’.
Leave a Reply