
नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात विकासकामांना वेग आला आहे. कुंभमेळ्यासाठी सरकारकडून तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार असल्याची चर्चा आहे. रस्ते, पायाभूत सुविधा आणि इतर विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, या मोठ्या निधीच्या खर्चावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
कुंभमेळ्यासाठी 30 हजार कोटींचा खर्च
एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कुंभमेळ्यासाठी करण्यात येणाऱ्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 30 हजार कोटी रुपये कुंभमेळ्यावर खर्च करण्याऐवजी त्यातून शिक्षण आणि आरोग्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी मोठी कामे करता आली असती, असं त्यांनी म्हटलं आहे. “कुंभमेळ्यावर 30 हजार कोटी रुपये खर्च होतात; या पैशांतून किती शाळा किंवा IIT उभारता आल्या असत्या?” असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. सरकारची प्राथमिक जबाबदारी नागरिकांना चांगल्या शाळा आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याची आहे, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांना वेग आला आहे. शहरातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि इतर आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. कुंभमेळ्यासाठी देशभरातून तसेच परदेशातूनही मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी गिरीश महाजन यांची कुंभमेळा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एकीकडे कुंभमेळ्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होणार असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे, तर दुसरीकडे एवढ्या मोठ्या निधीच्या खर्चाच्या प्राधान्यक्रमावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे कुंभमेळ्याच्या 30 हजार कोटींच्या खर्चावरून आगामी काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन
ऐतिहासिक आणि अत्यंत पवित्र मानला जाणारा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 31 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार असून तो 24 जुलै 2028 पर्यंत चालणार आहे. हिंदू धर्मातील या सर्वात मोठ्या आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन दर 12 वर्षांनी नाशिकमधील गोदावरी नदीच्या तीरावर आणि त्र्यंबकेश्वर येथे केले जाते. यंदा या कुंभमेळ्यासा संपूर्ण देशातून नागरिक हजेरी लावण्याची शक्यता आहे.
Leave a Reply