
मोठ्या स्टार्सचे चित्रपट, कोट्यवधींचं बजेट आणि जबरदस्त प्रमोशन असतानाही एखादा छोट्या बजेटचा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करतो, तेव्हा त्याची चर्चा होणारच. सध्या असाच एक चित्रपट चर्चेत आहे. नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने अत्यंत कमी बजेटमध्ये बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे.
‘हनुमान अंश’ची सुरुवात मात्र फारशी प्रभावी नव्हती. चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 10 लाख रुपयांची कमाई केली. पहिल्या आठवड्यात त्याचा व्यवसाय सुमारे 1.08 कोटी रुपये होता. दुसऱ्या आठवड्यात तर कमाई केवळ 40 लाख रुपयांपर्यंत राहिली. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करणार नाही, असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र तिसऱ्या आठवड्यात परिस्थिती पूर्णपणे बदलली.
तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत तब्बल 819 टक्क्यांची वाढ झाल्याचं वृत्त आहे. या काळात चित्रपटाने सुमारे 10.5 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर एकूण कलेक्शन 18 कोटी रुपयांच्या पुढे गेलं. अवघ्या 2 कोटींच्या आसपास खर्च करून तयार झालेल्या चित्रपटासाठी ही कमाई अत्यंत मोठी मानली जात आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटाच्या यशामागे केवळ कथा किंवा प्रेक्षकांचा प्रतिसादच नाही, तर प्रेमानंद महाराजांचा सल्ला आणि निर्मात्यांची श्रद्धाही चर्चेत आली आहे. 'हनुमान अंश'च्या प्रदर्शनापूर्वी चित्रपटाचे निर्माते प्रेमानंद महाराजांची भेट घेण्यासाठी गेले होते. दिग्दर्शक आणि लेखक विशाल चतुर्वेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शूटिंग पूर्ण झाल्यानंतर एका निर्मात्याने महाराजांची भेट घेऊन चित्रपटाच्या रिलीजपूर्वी मार्गदर्शन मागितलं होतं.
यावेळी महाराजांनी चित्रपटाच्या मुख्य कलाकाराला आपल्या जीवनशैलीबाबत विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला. मुख्य कलाकाराने शाकाहारी आहार घ्यावा, असं सांगण्यात आलं होतं. निर्मात्यांनी हा सल्ला गांभीर्याने घेतला. प्रेमानंद महाराजांच्या सल्ल्यानंतर चित्रपटाच्या सेटवरही काही नियम पाळण्यात आले. सेटवर कोणालाही शिवीगाळ करण्याची किंवा भांडण करण्याची परवानगी नव्हती. संपूर्ण टीमसाठी फक्त शाकाहारी जेवणाची व्यवस्था केली जात होती. तसंच चित्रपटाशी संबंधित कोणालाही दारू पिण्यास मनाई होती.
विशेष म्हणजे शूटिंगची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हनुमान चालीसा पठणाने केला जात होता. शूटिंगमध्ये काही अडचण आली किंवा कॅमेरा सुरू होण्यास विलंब झाला, तर टीम हनुमान चालीसा म्हणत असे. दिग्दर्शकांच्या म्हणण्यानुसार, अनेकदा चालीसा पूर्ण होईपर्यंत शूटिंगमधील अडचणीचं समाधान मिळत असे.
चित्रपटाच्या प्रमोशनची कहाणीही वेगळी आहे. निर्मात्यांकडे प्रमोशनसाठी जवळपास पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी नीम करोली बाबांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने तब्बल 8 भंडारे आयोजित केले. हेच भंडारे त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनचं माध्यम बनले.






Leave a Reply