
नेपाळमध्ये बुधवारी झालेल्या विनाशकारी प्रलयाने 400 हून अधिक लोकांचे बळी घेतले. सुमारे 1500 लोक अजूनही बेपत्ता आहेत. या प्रलयामुळे नेपाळी जनतेचा संसार धुळीस मिळाला आहे. सध्या नेपाळमध्ये बचाव कार्य सुरू करण्यात आलं असलं तरी नेपाळवरचं संकट काही अजून थांबलेलं नाही. नेपाळवर अजून एका नव्या संकटाचा धोका कायम आहे. नेपाळ-चीन सीमेवरील ग्यिरोंग बॉर्डर पोर्टवर ग्लेशियर तुटल्याने एक सरोवर तयार झालं आहे. हा सरोवरही ओव्हरफ्लो झाला व्हायला सुरुवात झाली आहे. या सरोवराचं पाणी किनाऱ्यावरून वाहायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नद्यांचा जलस्तर वाढून पुन्हा एकदा नेपाळमध्ये जलप्रलय होण्याची शक्यता आहे. नेपाळसाठी पुढचे 90 मिनिटे अत्यंत महत्त्वाचे असल्याचं चीनची सरकारी वृत्तसंस्था सीसीटीव्हीने म्हटलं आहे. नेपाळच नव्हे तर चीनलाही महाअलर्ट देण्यात आला आहे.
याच सरोवरामुळे गेल्या 24 तासापासून केवळ नेपाळच नव्हे तर चीनमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. नैसर्गिक ढिगाऱ्याने बनलेलं हे सरोवर अचानक फुटल्यास मोठ्या प्रमाणात पाणी आणि ढिगारा खालच्या भागाकडे जाऊ शकतं. त्यामुळे नेपाळमध्ये दुसरा जलप्रलय येऊ शकतो आणि हा जलप्रलय सर्वाधिक भयानक असू शकतो, असं सांगण्यात येत आहे.
पुढचे दीड तास महत्त्वाचे
सरोवरातून पाणी बाहेर पडत असल्याच्या बातम्या आल्यानंतर धोका पाहता नेपाळी सैन्याने मदत कार्याचं काम तात्पुरतं थांबवलं आहे. नेपाळी सैन्याच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेस्क्यू ऑपरेशन पुढचे तब्बल 1 तास 30 मिनिटासाठी थांबवण्यात आलं आहे. या काळात प्रभावित परिसरातील परिस्थितीवर नजर ठेवली जाणार आहे.
तर, सरोवराच्या किनाऱ्यावरून पाणी वाहत असल्याची माहिती मिळाली आहे. नदीचा जलस्तर वाढताना दिसत आहे. त्यामुळे नदीच्या आसपास असलेल्या रेस्क्यू टीम आणि नागरिकांच्या सुरक्षेला पहिलं प्राधान्य दिलं जात आहे, असं स्थानिक जिल्हाधिकाऱ्याने सांगितलं.
सरोवरात किती पाणी?
चीनकडून करण्यात आलेल्या सर्व्हेतून मिळालेल्या माहितीनुसार, या सरोवरात 25 लाख क्यूबिक मीटरहून अधिक पाणी जमा झालेलं आहे. एक दिवस आधीच इंजीनिअरिंग टीमने यात 15 ते 20 लाख क्युबिक मीटर पाणी असण्याचा अंदाज वर्तवला होता. म्हणजेच थोड्याच वेळात या सरोवरातील पाण्याचा स्तर प्रचंड प्रमाणात वाढला आहे.
पुढच्या तीन दिवसात सुमारे 30 लाख क्युबिक मीटर अतिरिक्त पाणी या सरोवरात पोहोचू शकतं, असा चीनने अंदाज वर्तवला होता. हा सरोवरात जवळपास 1200 ऑलिम्पिक आकाराच्या स्विमिंग पूल एवढं पाणी आहे. सरोवर फुटल्यास सरोवराच्या किनाऱ्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर येऊ शकतं. त्यामुळे सर्वांनी अलर्ट राहिलं पाहिजे, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.
चीनही सतर्क
दरम्यान, या धोक्यामुळे केवळ नेपाळच नव्हे तर चीनही सतर्क झाला आहे. धोका वाढल्याने चीनने आपल्या रेस्क्यू टीमच्या कर्मचाऱ्यांना आणि वाहनांना प्रभावित क्षेत्रातून हटवून सुरक्षित ठिकाणी नेलं आहे. चीनच्या सरकारी मीडियाच्या दाव्यानुसार, सरोवर फुटल्यास डोंगराचा काही भाग खचू शकतो. तसेच हिमस्खलन होऊ शकतं. त्यामुळे दुसरं संकट निर्माण होऊ शकतं.
चीनच्या इंजीनिअरने या सरोवराचा हवाई सर्व्हे आणि 3D मॉडलिंग केली आहे. त्यांच्या मते, सरोवर सुमारे 150 मीटर लांब आणि 40 ते 50 मीटर खोल आहे. धोका कमी करण्यासाठी सरोवराच्या खाली एक कृत्रिम बांध तयार करून पाणी खालच्या भागातून बाहेर काढण्याच्या पर्यायावरही चर्चा करण्यात आली. पाण्याला नियंत्रित पद्धतीने काढण्याचा हा प्रयत्न आहे.
सध्या तरी सर्वात मोठी चिंता म्हणजे, सरोवराचं पाणी किती वेगाने खाली येईल ही आहे. नेपाळमध्ये आधीच शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक बेपत्ता आहेत. त्या ठिकाणी मदत कार्य सुरू असतानाच दुसरं संकट दारात आलं आहे. त्यामुळे नेपाळ आणि चीनसाठीही पुढचे 90 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
Leave a Reply