
नेपाळमधील भीषण महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वित्त आणि मनुष्यहानी झाली आहे. याच महापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेपाळमधील एका बँकेची मोठी तिजोरी पाण्याच्या प्रवाहात वाहून थेट त्रिशुली नदीच्या पात्रात जाऊन अडकली. ही अवाढव्य तिजोरी नदीत अडकलेली पाहून स्थानिक नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले. तिजोरीत मोठी रोख रक्कम असल्याचा संशय आल्याने, काही स्थानिकांनी ती फोडून त्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. लाखो रुपयांची रोकड लुटण्याचा हा प्रयत्न सुरू असतानाच, पोलिसांना याची माहिती मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि लुटमारीचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली. पोलिसांनी धाड टाकून तिजोरीतील पैसे लुटण्याचा प्रयत्न करत असलेल्या एकूण २९ जणांना रंगेहाथ अटक केली. पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे बँकेच्या तिजोरीतील मोठी रक्कम वाचली असून, या घटनेमुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळातही काही लोकांकडून होणाऱ्या गैरफायद्यावर प्रकाश पडला आहे. या घटनेची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
Leave a Reply