
बॉक्स ऑफिसवर एखादा चित्रपट कधी आणि कसा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो, याचा अंदाज बांधणं अनेकदा कठीण असतं. याचाच प्रत्यय सध्या ‘हनुमान अंश’ या चित्रपटाच्या कमाईवरून येत आहे. कोणताही मोठा गाजावाजा किंवा तगडी प्रमोशनल मोहीम नसताना प्रदर्शित झालेल्या या आध्यात्मिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनपेक्षितपणे जोरदार कमबॅक केला आहे.
नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र तिसऱ्या आठवड्यापासून चित्रपटाच्या कमाईने अचानक वेग घेतला. ‘हनुमान अंश’ हा चित्रपट दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट प्रसिद्ध आध्यात्मिक संत नीम करोली बाबा, ज्यांना महाराजजी म्हणूनही ओळखलं जातं, यांच्या जीवन आणि आध्यात्मिक प्रवासावर आधारित आहे.
अवघ्या दोन कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट कोणत्याही मार्केटिंगशिवाय थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 'हनुमान अंश'ने तिसऱ्या आठवड्यात वेग पकडला आणि 2026 या वर्षातील बॉक्स ऑफिस हिट चित्रपटांपैकी एक बनला. हा चित्रपट 7 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवशी फक्त 10 लाख रुपयांची कमाई केली. पहिल्या दोन आठवड्यात या चित्रपटाने फक्त 1.48 कोटी रुपये कमावले.
तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाची लोकप्रियता आणखी वाढू लागली. प्रेक्षकांनी सोशल मीडियावर त्यांचे अनुभव शेअर केल्यामुळे अधिक लोक या चित्रपटाकडे आकर्षित झाले. तिसऱ्या आठवड्यात 10 कोटी रुपयांहून अधिक कमाई झाली. त्यानंतर चौथ्या आठवड्यात त्याहूनही मोठा बदल दिसून आला. चौथ्या शुक्रवारी 'हनुमान अंश'ने 6.25 कोटी रुपये कमावले आहेत. चौथ्या शनिवारी चित्रपटाच्या कमाईत तब्बल 48.37 टक्क्यांची वाढ झाली आणि एकाच दिवसात 9.25 कोटी रुपये कमावले.
चौथ्या शनिवारी या चित्रपटाने 10.74 कोटी रुपये कमावले आहेत. यामुळे चित्रपटाची एकूण कमाई 38.12 कोटी रुपये झाली आहे. विशेष म्हणजे, मोठ्या स्टार्सच्या आणि बिग बजेट चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘हनुमान अंश’ने आपली जागा निर्माण केली आहे. ‘टॉक्सिक’सारख्या मोठ्या चित्रपटाच्या रिलीजदरम्यानही या सिनेमाची कमाई टिकून राहिली.




Leave a Reply