
राजेंद्र रुपनवर प्रकरणात ट्विस्ट पाहायला मिळत आहे. काही दिवसांआधी डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी माजी मंत्री तानाजी सावंत यांचे कथित पीए प्रसाद कोंडे देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यांनी त्यांच्या हातावरही कोंडे देशमुख यांच्या नावाचा उल्लेख केला होता. परंतु रुग्णालयात उपचारादरम्यान डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी जबाब बदलल्याचा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. डॉ. रुपनवर यांच्यावर राजकीय दबाव निर्माण केल्याचा दावा अंधारे यांनी केला. या सर्व आरोपांवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी दोषींवर कारवाई होईल, असे स्पष्ट केले.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी माध्यमाशी संवाद साधला. या प्रकरणावर मंत्री आबिटकर म्हणाले, ‘राजेंद्र रुपनवर यांच्या तेथील डॉक्टरांच्या विरोधात तक्रार होत्या. त्यासाठी एक कमिटी नेमली. यात जे दोषी आढळले, त्यात वैद्यकीय अधीक्षक देखील होते. त्यांनाही आम्ही निलंबित केलं आहे. त्यांच्यावरही कारवाई केली आहे. त्या सगळ्या कारवाई होतील. परंतु आत्महत्या हा पर्याय नाही. आपण या प्रकरणाचा विचार केला पाहिजे. आपल्यावर अन्याय झाला, तर आपण भांडलं पाहिजे. आपल्याकडे संविधानिक अधिकार आहेत. दुर्दवाने ही घटना घडली’. माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पीएने त्रास दिल्याच्या आरोपावर आबिटकर म्हणाले, ‘आपल्याला तक्रार असेल, तर आपण देऊ शकतो. आपण ती तक्रार पोलिसांत दिली होती. पोलीस तपास करून कारवाई करतात. ती संबंधित व्यक्ती कोण आहे, यापेक्षा कायदा सर्वात मोठा आहे. असं असताना आत्महत्येचं पाऊल उचलायला नव्हते पाहिजे. ही दुर्दैवी घटना घडली. या यंत्रणेत कोण चुकीचं असेल, त्यांच्यावर कारवाई करत आहोत. एक गुन्हा दाखल झाला आहे. आमच्या चौकशी समितीने एकाला निलंबित केलं आहे. जो दोषी असेल, त्यांच्यावर कारवाई होईल’.
राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्येनंतर मार्ड संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. यावर आबिटकर म्हणाले, ‘ दुर्दैवाने घटना घडते. डॉक्टर हे नागरिकांसाठी महत्त्वाची यंत्रणा आहे. अपवादात्मक घटना घडली. असा घटना घडू नये, यासाठी कायदेशीर प्रक्रिया करत आहोत. डॉ. राजेंद्र हे आमच्याकडे 10 ते 12 महिने होते. ते कायमस्वरुपी नव्हते. त्यांची सुरुवात होती. तरुणाने उत्साही पाहिजे होते. हे सर्व दु:खद आहे.
रुपनवर यांचा मृत्यूआधी जबाब बदलल्याचा आरोप होत आहे, यावर आबिटकर म्हणाले, ‘पोलीस चौकशी होईल. जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई होईल. एखादं कोणी दोषी असेल, त्यांच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. यात फार बोलणे अपेक्षित नाही. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. पोलिसांना यात काम करू द्या. जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई होईल’.
Leave a Reply