
ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. नुकताच एक चित्रपट ऑनलाइन स्ट्रीम झाला आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. ओटीटीवर येताच या चित्रपटाने आपली कमाल दाखवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण चित्रपटाची धुरा फक्त आणि फक्त एका अभिनेत्रीने सांभाळली आहे.
या चित्रपटात कॉमेडी आणि अॅक्शनचा डबलडोस पहायला मिळतो. यातील मुख्य अभिनेत्रीने चित्रपटांना रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तिच्या दिग्दर्शक पतीने एकत्र मिळून एखादा कौटुंबिक चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली आणि जेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षक-समिक्षकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
या चित्रपटाची कथा स्वर्णा नावाच्या एका अनाथ मुलीची आहे, जी दिसायला साधीसुधी आणि भोळी वाटत असली तरी तिचा भूतकाळ अत्यंत खतरनाक आहे. लग्नानंतर ती तिच्या डॉक्टर पतीच्या कुटुंबीयांची मनं जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करते, परंतु त्यात ती सतत अपयशी ठरत असते. तेव्हाच स्वर्णाच्या आयुष्यात तिच्या भूतकाळातील काही शत्रूंची एण्ट्री होते. तेव्हा कुटुंबाला आणि स्वत:ला वाचवण्यासाठी ती तिच्या खऱ्या रुपात येते.
या चित्रपटाचं नाव 'मा इंटी बंगारम' असं असून यामध्ये समंथा रुथ प्रभूची मुख्य भूमिका आहे. जियो हॉटस्टारवर हा चित्रपट स्ट्रिम होत असून अल्पावधीतच तो ट्रेंडिंगमध्ये पोहोचला आहे. या महिलाप्रधान चित्रपटाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत उत्तम कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने कमाईचा 100 कोटींचा आकडा पार केला आहे.
'मा इंटि बंगारम' या चित्रपटाला आयएमडीबीवर दहापैकी 7.7 रेटिंग मिळाली आहे. बी. व्ही. नंदिनी रेड्डी दिग्दर्शित या चित्रपटाची कथा समंथाचा पती राज निदिमोरूने लिहिली आहे. यामध्ये समंथासोबतच गुलशन देवैय्या आणि दिगांत मंचले यांच्या मुख्य भूमिका आहेत.





Leave a Reply