
गेल्या काही दिवसांपासून राज्याती आश्रम शाळा चर्चेचा विषय ठरत आहेत. या आश्रन शाळामंध्ये घडत असलेल्या धक्कादायक घटना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. अशीच एक घटना नाशिकमधील जोपुळ येथील यशवंतराव पाटील एज्युकेशन सोसायटीच्या आश्रमशाळेत घडली आहे. येथे इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोळा वर्षीय हरिदास अंबादास शेखरे या विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
नेमकं काय घडलं?
प्राप्त माहितीनुसार, विद्यार्थ्याने एका विद्यार्थिनीला चिठ्ठी दिल्याच्या कारणावरून मुख्याध्यापिकांनी त्याला कार्यालयात बोलावले होते. या घटनेमुळे त्याला मानसिक तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर त्याने आश्रमशाळेतच आत्महत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर शाळा परिसरात खळबळ माजली. मृत विद्यार्थ्याचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पालकांच्या या मागणीनंतर पोलिसांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
प्रकरणाची चौकशी सुरु
हरिदासचा मृतदेह पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तेथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. वणी पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी सुरू केली असून सर्व बाजूंनी माहिती गोळा केली जात आहे.
आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना राहण्याची आणि शिक्षणाची सोय असते. अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. या घटनेमुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्येही चिंता निर्माण झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिठ्ठीच्या प्रकरणामुळे विद्यार्थ्याला तणाव आला होता. मात्र, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याने अचूक कारणे समोर येणे बाकी आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई होईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. आश्रमशाळा व्यवस्थापनानेही चौकशीचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि मानसिक आरोग्याबाबत शाळांमध्ये अधिक सजगता बाळगण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे. वणी पोलीस ठाणे प्रकरणाचा तपास गांभीर्याने करत आहे.
Leave a Reply