
सध्या राज्यात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) चांगलेच चर्चेत आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उचललेल्या प्रत्येक पाऊलाचे कौतुक होत आहे. बेधडक कारवायांमुळे एफडीएच्या कामकाजात शिस्त येत असतानाच ऑनलाइन तक्रारींच्या प्रणालीमुळे तक्रारींची संख्याही लक्षणीयरीत्या वाढली आहे. या नवीन सुविधेमुळे अधिकाऱ्यांसमोर आता नव्या प्रकारच्या तक्रारींचे टेन्शन निर्माण झाले आहे.
गेल्या दोन महिन्यांत एफडीएच्या पोर्टलवर तब्बल ७००५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात बायकोने रात्रीचा शिळा भात सकाळी नाष्ट्याला दिला, घराजवळ दारूचे दुकान आहे अशा घरगुती आणि विचित्र स्वरूपाच्या तक्रारींचाही समावेश आहे. ऑनलाइन प्रणाली सुरू झाल्यानंतर आतापर्यंत २८०९ तक्रारींची चौकशी पूर्ण होऊन त्या निकाली काढण्यात आल्या आहेत.
अन्न आणि औषध सुरक्षिततेबाबत ग्राहकांच्या तक्रारी अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. तक्रार नोंदवण्यासाठी अत्याधुनिक ऑनलाइन पोर्टल (complaints.mahafda.in) सुरू करण्यात आले आहे.
या पोर्टलद्वारे अन्न सुरक्षा आणि औषध सुरक्षा संबंधित तक्रारी एकाच ठिकाणी दाखल करता येतात. तक्रार सबमिट केल्यानंतर तिची सद्यस्थिती (Track Status) तपासण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, एफडीएने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातील कॅरी अँड फॉरवर्डिंग (C&F) युनिटचा औषध विक्री परवाना रद्द करण्यात आला आहे. रिएक्टिन प्लस टॅब्लेट्सच्या स्टोरेज, पॅकेजिंग आणि बाजारातून औषध परत मागवण्याच्या प्रक्रियेत आढळलेल्या गंभीर अनियमिततेमुळे ही कारवाई करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील वाडकी येथील कंपनीच्या मुख्य वेअरहाऊसमध्ये झालेल्या तपासणीनंतर ही कारवाई झाल्याची माहिती आहे.




Leave a Reply