
मुंबईतील घाटकोपर येथील साकीनाका गौसिया चाळ परिसरात रात्रीभर पडलेल्या पावसामुळे डोंगराचा काही भाग कोसळला. या घटनेत दोन ते तीन घरांवर दरड कोसळली असून पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगराचा काही भाग अचानक कोसळला आणि त्यातील माती व दगड दोन-तीन घरांवर पडले. यामुळे काही व्यक्ती घरात अडकले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अधिकृत आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नसली तरी प्राथमिक अंदाजानुसार पाच ते सहा जण अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.
अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्याला वेग दिला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली असून प्रशासनाने परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply