
1994 मध्ये प्रदर्शित झालेला 'अंजाम' हा चित्रपट त्या काळातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या चित्रपटांपैकी एक होता. 'डर' आणि 'बाजीगर'नंतर शाहरुख खानने सलग तिसऱ्यांदा नकारात्मक भूमिका साकारली होती. तसेच शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित ही लोकप्रिय जोडी प्रथमच या चित्रपटातून एकत्र झळकली.
चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील गाण्यांनीही प्रचंड लोकप्रियता मिळवली. 'बडी मुश्किल है', 'कोल्हापूर से आई हूं', 'तू सामने जब आता है' आणि विशेषतः 'चने के खेत में' ही गाणी आजही प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीची आहेत.
माधुरी दीक्षितने एका मुलाखतीत 'चने के खेत में' या गाण्याशी संबंधित एक रंजक आठवण सांगितली होती. तिने सांगितले की, सुरुवातीला या गाण्याच्या डान्स स्टेप्स तिला अजिबात आवडल्या नव्हत्या. दिग्दर्शक राहुल रवैल यांनी गाणे ऐकवल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर कोरिओग्राफर सरोज खान यांनी गाण्याच्या प्रत्येक शब्दातील भाव आणि अभिनयावर भर देत नव्याने स्टेप्स तयार केल्या. माधुरी आणि सरोज खान यांच्या संयुक्त प्रयत्नांनंतर हे गाणे चित्रित करण्यात आले आणि पुढे ते सुपरहिट ठरले. या गाण्याला आनंद-मिलिंद यांनी संगीत दिले असून समीर यांनी गीतलेखन केले आहे.
'अंजाम' हा केवळ शाहरुख खानच्या प्रभावी खलनायकी भूमिकेसाठीच नाही तर माधुरी दीक्षितच्या दमदार अभिनयासाठी आणि आजही लोकप्रिय असलेल्या गाण्यांसाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक संस्मरणीय चित्रपट मानला जातो.




Leave a Reply