
महाराष्ट्रात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच कोल्हापूरमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर शहरातील नवी वाशी नाका परिसरात भाजप कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सूरज साखरे यांच्यावर दोन जणांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत ते जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
प्राथमिक तपासात खासगी सावकारकीशी संबंधित वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. परिसरातील CCTV फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे संबंधितांचा शोध घेतला जात आहे. सूरज साखरे यांच्याविरोधात यापूर्वी काही गुन्ह्यांची नोंद असल्याची माहितीही समोर आली आहे. या घटनेमुळे कोल्हापूर शहरात चर्चांना उधाण आले आहे.
Leave a Reply