
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र धाराशिव जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या सोबत आणखी पाच खासदारांनीही शिंदे गटाची साथ दिल्याची माहिती समोर आली आहे. एकाच वेळी सहा खासदारांनी पक्ष बदलल्याने ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे.
या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. तसेच खासदारांनंतर शिवसेना ठाकरे गटातील काही आमदारही बंडखोरी करू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आमदारांना रोखण्यासाठी ठाकरे गटाकडून हालचालींना वेग आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात या घडामोडींमुळे ठाकरे गटाला मोठे खिंडार पडल्याची चर्चा आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून सोशल मीडियावर वादही निर्माण झाला आहे. माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे पुत्र शुभम चौगुले यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या विषयावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
शुभम चौगुले यांनी आपल्या पोस्टमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उमरग्यात येऊन शिवसैनिकांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच त्यांनी माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे तिकीट कापले जाणे आणि अनुभवी नेत्यांऐवजी नवीन उमेदवाराला संधी दिल्यामुळे पराभव झाल्याचा आरोपही केला आहे.
पोस्टमध्ये पुढे त्यांनी म्हटले आहे की, “उशिरा का होईना शिंदे यांच्या दूरदृष्टीची जाणीव झाली आहे, पण उमरगा तालुक्यात नाराजी कायम आहे.” जर विश्वास पुन्हा मिळवायचा असेल तर ओमराजे निंबाळकर यांनी रवींद्र गायकवाड, ज्ञानराज चौगुले आणि सर्व शिवसैनिकांची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या पोस्टनंतर उमरगा तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून शिवसेनेतील अंतर्गत वाद आणि स्थानिक राजकारणात नवीन चर्चांना उधाण आले आहे.
Leave a Reply