
सोनी टीव्हीवरील ‘इंडियन आयडॉल 16’ या रिअॅलिटी शोचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला असून ओडिशाच्या ज्योतीर्मयी नायकने विजेतेपद पटकावलं आहे. अनेक महिन्यांची मेहन, कठीण ऑडिशन्स आणि धमाकेदार परफॉर्मन्सनंतर ज्योतीर्मयीने ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. या दणदणीत विजयानंतर तिला ‘इंडियन आयडॉल 16’ची ट्रॉफी आणि 20 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं आहे. ग्रँड फिनालेमध्ये विजेत्याची घोषणा होताच ज्योतीर्मयीवर संपूर्ण देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. तर माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीसुद्धा तिचं अभिनंदन केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी म्हटलंय, “ज्योतीर्मयीचं हे यश देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारं आहे.”
‘इंडियन आयडॉल 16’ हा सिझन ‘यादों की प्लेलिस्ट’ या संकल्पनेवर आधारित होता. ग्रँड फिनालेमध्ये ज्योतीर्मयीने अंशिका चोंकर, मनराज वीर सिंह, मेसिमे बसू, सुहेल सुफी आणि तनिष्क शुल्का या पाच स्पर्धकांवर मात केली. तिच्या या विजयानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलं, ‘इंडियन आयडॉल 16 जिंकल्याबद्दल ओडिशाची कन्या ज्योतीर्मयी नायक हिचं मन:पूर्वक अभिनंदन. आपल्या सुमधूर आवाजाने आणि अथक परिश्रमाने तिने देशभरात ओडिशाचं नाव मोठं केलं आहे. तिचं समर्पण आणि हे यश तरुणांना निश्चितच प्रेरणा देणारं आहे.’
धर्मेंद्र प्रधान यांची पोस्ट-
ଇଣ୍ଡିଆନ୍ ଆଇଡଲ୍-୧୬ର ବିଜେତା ହୋଇଥିବା ଓଡ଼ିଶାର ଝିଅ ଜ୍ୟୋତିର୍ମୟୀ ନାୟକଙ୍କୁ ଅନେକ ଶୁଭେଚ୍ଛା । ନିଜର ସୁମଧୁର ସ୍ୱର ଓ କଠିନ ପରିଶ୍ରମ ବଳରେ ସେ ସମଗ୍ର ଦେଶରେ ଓଡ଼ିଶାର ନାଁ ଉଜ୍ଜ୍ୱଳ କରିଛନ୍ତି । ତାଙ୍କର ଏହି ନିଷ୍ଠାପର ସାଧନା ଓ ସଫଳତା ଯୁବପିଢିଙ୍କୁ ପ୍ରେରିତ କରିବ । #IndianIdol16
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) July 26, 2026
ज्योतीर्मयीने या संपूर्ण सिझनमध्ये तिच्या अप्रतिम गायनकौशल्याने परीक्षक आणि प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ट्रॉफी, 20 लाख रुपयांचं बक्षीस यांसोबतच तिला सोनी टीव्हीकडून एक गायनाचा करारसुद्धा मिळाला आहे. या सिझनमध्ये जबलपूरचा तनिष्क शुक्ला उपविजेता ठरला. ग्रँड फिनालेमध्ये ज्योतीर्मयीने ‘सैया ओ सैया’ या गाण्याचं अप्रतिम सादरीकरण केलं होतं. तिच्या परफॉर्मन्सनंतर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून तिला दाद दिली.
फक्त ग्रँड फिनालेमध्येच नाही तर संपूर्ण सिझनमध्ये तिने अनेक गाण्यांचं अविस्मरणीय सादरीकरण केलं. एका एपिसोडमध्ये जेव्हा तिने ‘ओ जब तक है जान..’ हे गाणं गायलं होतं, तेव्हा पाहुण्या म्हणून उपस्थित राहिलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी या त्यांच्या जागेवरून उठून उभ्या राहिल्या आणि टाळ्या वाजवल्या होत्या. ग्रँड फिनालेमध्ये परीक्षक श्रेया घोषाल आणि बादशाह यांच्यासह उषा उथुप, उदित नारायण, पॅपॉन, कुमार सानू, शहनाज गिल आणि उर्मिला मातोंडकर यांसारख्या मोठ्या कलाकारांची उपस्थिती होती.
Leave a Reply