
क्रिकेट खेळाला काळिमा फासणारी घटना आजापासून 16 वर्षांपूर्वी घडली होती. 28 ऑगस्ट 2010 रोजी पाकिस्तान क्रिकेट संघातून स्पॉट फिक्सिंग प्रकरण उघडकीस आलं होतं. त्यानंतर क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात सलमान बट, मोहम्मद आमिर आणि मोहम्मद आसिफ यांचं नाव समोर आलं होतं. खरं तर हे प्रकरण जगासमोर एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून आलं होतं. पण पाकिस्तान संघातील काही खेळाडूंना याची कल्पना आधीच आली होती. अब्दुल रज्जाकने या प्रकरणावर तेव्हा नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा केला होता. अब्दुल रज्जाक म्हणाला की, जेव्हा या प्रकरणाबाबत शाहिद आफ्रिदीला कळलं तेव्हा त्याने आमिरला खोलीत बोलवून घेतलं. त्यानंतर त्या खोलीतून कानशिलात लगावल्याचा आवाज आला. त्यानंतर आमिरने या प्रकरणात सहभागी असल्याचं मान्य केलं.
शाहिद आफ्रिदीने कानशिलात लगावली
शाहिद आफ्रिदीने हे प्रकरण उघडकीस येण्यापूर्वी कसोटी संघाचं कर्णधारपद सोडलं होतं. तसेच व्हाईट बॉल क्रिकेटचं नेतृत्व करत होता. अब्दुल रज्जाकने खुलासा करत सांगितलं की, आफ्रिदीने आमिरला खोलीत बोलवलं आणि दरवाजा बंद करून चौकशी करू लागला. आमीर पहिलं तर काहीच खरं सांगत नव्हता. पण त्यानंतर खोलीतून कानशिलात लगावल्याचा आवाज आला आणि आमिर रडू लागला. त्याने रडतच मान्य केलं की या प्रकरणात सहभागी होता. जर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या प्रकरणावर ठोस पावलं उचलली असती तर हे प्रकरण पुढे गेलंच नसतं.
अब्दुल रज्जाकने पुढे सांगितलं की, पाकिस्तान संघातील काही वरिष्ठ खेळाडूंनी संघ व्यवस्थापनाकडे याची तक्रारही केली होती. तसेच या खेळाडूंना दंड ठोठावून आयसीसीचे निर्बंध लादून पाकिस्तानात परत पाठवण्याचा सल्ला दिला होता. अखेर आयसीसीने सलमान बट, आमिर आणि आसिफ यांच्यावर बंदी घातली.
अब्दुल रज्जाकला कसं कळलं?
अब्दुल रज्जाकने एका टीव्ही शोमध्ये खुलासा केला की, त्याला स्पॉट फिक्सिंगबाबत एका मोबाईल दुरूस्ती करणाऱ्या मित्राकडून कळलं. मजहर मजीदने त्याच्या मित्राकडे दुरूस्तीसाठी एक खराब फोन दिला होता. फोन दुरूस्तीनंतर मित्राने फोनमधील सट्टेबाजीशी संबंधित मेसेज वाचले. त्यात स्पॉट फिक्सिंगचा उल्लेख असलेले मेसेज होते. त्याने हे मेसेज अब्दुल रज्जाकला दाखवले आणि त्याने हे प्रकरण शाहिद आफ्रिदीला सांगितलं.
Leave a Reply