
भारतात 2029 साली लोकसभा निवडणूक होणार आहे. 2024 च्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयश आले होते. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत नेमकं काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशातच जर आज देशात लोकसभा निवडणुका झाल्या तर कुणाची सत्ता येईल? NDA की INDIA, कोणत्या आघाडीला किती जागा मिळतील? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे. आता या सर्व प्रश्नांची उत्तरे एका सर्वेक्षणातून समोर आली आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आज लोकसभा निवडणुका झाल्या तर कोणाची सत्ता?
इंडिया टुडे आणि सी-व्होटरच्या ताज्या मूड ऑफ द नेशन या सर्वेक्षणातून महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. आज निवडणूक झाली तर केंद्रात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होऊ शकते. सर्वेक्षणानुसार, आज लोकसभा निवडणुका झाल्यास एनडीएला 326 जागा, इंडिया आघाडीला 185 जागा, तर इतर पक्षांना 32 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर एनडीएला 45 टक्के, इंडिया आघाडीला 39 टक्के आणि इतरांना 16 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. एकट्या भाजपचा विचार केला तर पक्षाला 261 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 106 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतर पक्षांच्या खात्यात एकूण 176 जागा जाऊ शकतात.
सर्वेक्षण कसे करण्यात आले?
देशातील सर्व राज्ये आणि लोकसभा मतदारसंघांमध्ये 1 जुलै 2026 ते 25 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध वयोगट, जात, धर्म आणि लिंगाच्या 25,184 प्रौढ नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. याशिवाय मागील 24 आठवड्यांत 91795 लोकांकडून घेण्यात आलेल्या मतांचाही सर्वेक्षणात समावेश करण्यात आला. अशा प्रकारे एकूण 1 लाख 16 हजार 644 लोकांच्या मतांचा आढावा घेऊन देशातील विविध मुद्द्यांवर जनतेचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात कोणाला किती जागा?
उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीला 40 टक्के, तर एनडीएला 42 टक्के मतांचा वाटा मिळण्याचा अंदाज आहे. जागांच्या बाबतीत इंडिया आघाडीला 41 जागा, तर एनडीएला 38 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात एनडीएला 49 टक्के, तर इंडिया आघाडीला 43 टक्के मतांचा वाटा मिळण्याचा अंदाज आहे. जागांचा विचार केला तर एनडीएला 31 जागा, तर इंडिया आघाडीला 17 जागा मिळण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदींच्या कामगिरीबाबत जनतेचे मत काय?
सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीसह एनडीए सरकारच्या कामगिरीबाबतही जनतेचे मत जाणून घेण्यात आले. ऑगस्ट 2026 च्या सर्वेक्षणात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीबाबत प्रश्न विचारला असता 51 टक्के लोकांनी त्यांची कामगिरी चांगली असल्याचे सांगितले. 17 टक्के लोकांनी कामगिरी सरासरी असल्याचे म्हटले, तर 27 टक्के लोकांनी कामगिरी खराब असल्याचे मत व्यक्त केले.
Leave a Reply