
एमपीएससीची तयारी करणाऱ्या पुण्यातील प्रथमेश देशमुख या तरुणाने जीवन संपवल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या टोकाच्या निर्णयाने पुन्हा एकदा मोठी समस्या निर्माण झाली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी या प्रश्नावर आता महाराष्ट्रात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचं सांत्वन केल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना अभिजीत दीपके यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
अभिजीत दीपके यांनी आज पुण्यात येऊन प्रथमेश देशमुख याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. त्यानंतर दीपके यांनी मीडियाशी संवाद साधला. प्रथमेश समोर आर्थिक अडचणी होत्या. त्याच्यावर कर्जही होतं. त्यामुळे तो खचला होता. पुण्यात राहताना तो एकवेळचं जेवण करून दिवस काढत होता. त्यातच प्रथमेशची शेती वाहून गेली. दुष्काळ पडल्याने तो खचून गेला होता. त्या नैराश्यातूनच त्याने टोकाचं पाऊल उचललं, असं सांगतानाच कितीही संकट आलं तरी खचून जाऊ नका. हार मानू नका, असं आवाहन अभिजीत दीपके यांनी विद्यार्थ्यांना केलं. तसेच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मी स्वतः महाराष्ट्रात मैदानात उतरणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
एमपीएससीवर हल्लाबोल
दीपके यांनी यावेळी परीक्षा पद्धतीवरही जोरदार टीका केली. ग्रामीण भागातील मुलं जेव्हा शहरात शिकायला येतात तेव्हा त्यांच्यासमोर अनंत अडचणी असतात. त्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. प्रथमेश पुण्यात चार वर्षापासून अभ्यास करत होता. त्याच्याकडे रोजगार नव्हता. दाजींनी पाठवलेल्या पैशावर त्याची गुजराण होत होती. खर्च वाढू नये म्हणून तो पोटाला चिमटा काढत होता. प्रथमेशसह ग्रामीण भागातून शहरात आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची अशीच अवस्था आहे. आणि एमपीएससीचा काय कारभार सुरू आहे हे तुम्हाला माहीतच आहे. परीक्षा नीट होत नाही. झाली तर निकाल वेळेवर लागत नाही. पेपर फुटतात. त्यातून विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जातात, असं दीपके म्हणाले.
विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली गट कची परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गट क परीक्षा तब्बल चौथ्यांदा पुढे ढकलल्याने विद्यार्थी नैराश्यात गेले आहेत. एमपीएससीने प्रथमेश देशमुख या युवकाचा पहिला बळी घेतला, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात एमपीएससी मार्फत घेण्यात येत असलेल्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात पेपर फुटी होत आहे. सरकारने पेपर फुटीवर लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी, अशी मागणी हे विद्यार्थी करत आहेत.
Leave a Reply