
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट आणि गाणी दिली आहेत. ‘खइके पान बनारस वाला’, ‘रंग बरसे’ आणि ‘मेरे अंगने में’ यांसारख्या गाण्यांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका प्रेक्षकांसमोर साकारल्या आहेत. मात्र त्यांच्या ‘अँग्री यंग मॅन’ या प्रतिमेपेक्षा अगदी वेगळे आणि मनाला शांत करणारे एक गाणे आजही विशेष लोकप्रिय आहे. हे गाणे म्हणजे ‘छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा’.
1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘याराना’ या चित्रपटातील हे गाणं आजही रसिकांच्या पसंतीस उतरते. विशेष म्हणजे या गाण्याचा संबंध थेट रवींद्रनाथ टागोर यांच्या रवींद्रसंगीताशी आहे. ‘छू कर मेरे मन को’ हे टागोरांच्या ‘तोमार होलो शुरू, आमार होलो सारा’ या प्रसिद्ध बंगाली रचनेवर आधारित असल्याचे सांगितले जाते.
संभ्रम दूर होताच चित्रपटात गाण्याचा समावेश
‘याराना’च्या निर्मितीदरम्यान या गाण्याच्या चालीबाबत काहीसा संभ्रम होता. मात्र अमिताभ बच्चन यांनी धून ऐकल्यानंतर तिला पसंती दिली आणि त्यानंतर हे गाणं चित्रपटात समाविष्ट करण्यात आले. याच धुनेचा प्रभाव यापूर्वीच्या ‘प्यासा’ चित्रपटातील ‘हम आपकी आंखों में इस दिल को बसा दें तो’ या गाण्यावरही असल्याचे सांगितले जाते.
चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना गाण्याच्या चालीबाबत अमिताभ बच्चन यांनी संगीतकार राजेश रोशन यांच्याशी चर्चा केली होती. गाणे त्यांच्या शूटिंगच्या दृष्टीने खूप वेगवान असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र राजेश रोशन यांनी अमिताभ यांना गाण्यावर विश्वास ठेवण्यास सांगितले. अखेर गाण्याचे चित्रीकरण पूर्ण झाले आणि ते प्रचंड लोकप्रिय ठरले.
किशोर कुमार यांच्या आवाजाने गाणं ठरलं सुपरहिट
या गाण्याला किशोर कुमार यांनी आपल्या मधुर आवाजात गायले आहे. राजेश रोशन यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या बंगाली रचनेतील भाव आणि धून यांचा सुंदर वापर करून हिंदी गाण्याला वेगळी ओळख दिली. गाण्याच्या सुरुवातीच्या दोन ओळी रवींद्रसंगीतातून प्रेरित असल्याचे सांगितले जाते. गाण्याचे हिंदी बोल अनजान यांनी लिहिले होते.आज अनेक दशकांनंतरही ‘छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा’ हे गाणे मनाला शांत करणारे सदाबहार गाणं ठरले आहे.
Leave a Reply