
उत्तर प्रदेशात निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. समाजवादी पार्टीच्या नेत्या, खासदार डिंपल यादव यांनी आता थेट महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. समाजवादी पार्टी सत्तेत आल्यावर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी स्त्री सन्मान समृद्धी योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी 40 हजार रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे. तसेच लाडक्या बहिणींची ही रक्कम दरवर्षी वाढवली जाणार आहे, अशी घोषणाच डिंपल यादव यांनी केली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत डिंपल यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. समाजवादी पार्टीने ही घोषणा करून एक प्रकारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कुरघोडीच केली आहे. महिलांसाठीची ही योजना टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येईल. त्यात सुधारणा करण्यात येईल. सन्मान समृद्धीचा मार्ग महिलांना आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग होईल. त्यांनी मानवर करून जगलं पाहिजे, यासाठीच आम्ही ही योजना आणत आहोत, असं डिंपल यादव म्हणाल्या.
अखिलेश यादव यांनीही आम्ही महिलांच्या सन्मानाची ही योजना सुरू करणार आहोत. महिलांचं सक्षमीकरण व्हावं यासाठी ही योजना आणली जात आहे. आमचं सरकार असताना आम्ही जे निर्णय घेतले होते, ते क्रांतीकारी होते. आजही या निर्णयाचं सर्वांना फायदा होत आहे, असा दावाही अखिलेश यादव यांनी केला.
जापानी डेलिगेशन आणि…
गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात जापानी डेलिगेशन आलं होतं. तेव्हा आम्ही बनवलेली 1090 सिस्टिम दाखवली गेली. ही योजना तर अर्ध्या लोकसंख्येच्या स्वातंत्र्याचा संकल्प आहे. आम्ही आता दर वर्षी महिलांना 40 हजार रुपये देणार आहोत. आम्ही पूर्वीही लॅपटॉपचं वितरण केलं होतं. ते लॅपटॉप आजही सुरू आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
त्यांच्यासाठी नारी म्हणजे नारा
यावेळी त्यांनी कुणाचं नाव न घेता सत्ताधाऱ्यांवर टीका केली. आज ज्या लोकांना काही कळत नाही ते टॅबलेट वाटप करण्याचं आमिष दाखवत आहेत. आज अंगठा घासला तरी स्क्रीनवर काहीच चालत नाही. भाजपसाठी नारी म्हणजे केवळ नारा आहे. भाजपचे लोक नारी वंदनच्या गप्पा मारतात, असं सांगतानाच भाजपला हाथरसच्या कन्येची आठवण करून द्या. त्यांनी आई आणि मुलीला जिवंत जाळलं, असा आरोप त्यांनी केला.
विद्यार्थ्यांना लॅपटॉप देणार
राज्यात सत्ता आल्यावर आठवी पर्यंतचे ज्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्या पुन्हा उघडण्यात येईल. महिलांसाठी तयार करण्यात आलेली 1090 सिस्टिम अधिक मजबूत केली जाईल. पोलिस दलात 33 टक्के महिला आरक्षण लागू करण्यात येईल. महिला आणि मुलांसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात येईल. तसेच इंटर परीक्षा पास करणाऱ्या मुलांना लॅपटॉप दिला जाईल. प्रत्येक जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधलं जाईल, अशी घोषणाही अखिलेश यांनी केली.
Leave a Reply