
राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. विदर्भात नगरसेवकांच्या कथित पळवापळवीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप करत, “5-5 लाख रुपये देऊन नगरसेवक उचलले जात आहेत,” असा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 1 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असला तरी महाविकास आघाडीत अद्याप बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू आहे. अशातच विदर्भातील काही काँग्रेस नगरसेवक नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला की, “नगरसेवकांना पैशांचे आमिष दाखवून फोडाफोडी केली जात आहे. 15-15 लाख रुपये देऊन मतांची खरेदी होत असेल तर लोकशाही धोक्यात येईल.” त्यांनी पुढे म्हटलं की, “2014 पासून सुरू झालेल्या या राजकारणामुळे निष्पक्ष निवडणुका आणि सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व संपत चाललं आहे.”
दरम्यान, विधान परिषद निवडणूक ही आता “100 कोटींची निवडणूक” बनल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली. तसेच भाजपमधील काही नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचं सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. शिवानी वडेट्टीवार यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत विचारण्यात आल्यानंतर, “अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतरच भूमिका स्पष्ट होईल,” असं त्यांनी सांगितलं.
Leave a Reply