
रिपोर्टर – कृष्णा सोनारवाडकर : महिन्याभरापासून महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवायांचा धडाका सुरूच असून त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बऱ्याच काळापासून राज्यातील विविध हॉटेल्स , रेस्टॉरंट्स, तसेच अनेक क्विक-कॉमर्स कंपन्यांवर कारवाई केली होती. त्यातच आता FDA ने मुंबईतील चार अन्न आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. तपासणीदरम्यान स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, अन्न साठवणूक तसेच क्रॉस-कंटॅमिनेशनसंदर्भात गंभीर त्रुटी आढळून आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे चारही आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले .
मिळालेल्या माहितीनुसार, FDAच्या पथकाने कांदिवलीतील गरवारे इन्स्टिट्यूट कॅम्पस येथील अक्षय कोर्ट्स, BKC येथील Craftpac Hospitality Pvt. Ltd., Jio World Drive, दादर पश्चिम येथील मे. मारियन हॉटेल अँड रेस्टॉरंट आणि चेंबूर, टिळक नगर येथील मे. भगवती स्टोअर्स यांची तपासणी केली. मात्र त्यादरम्यान अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आणि अस्वच्छ परिस्थिती आढळली. तिथे स्वच्छता, ड्रेनेज, अन्नसाठवणूक आणि क्रॉस-कंटॅमिनेशनबाबत गंभीर त्रुटी या तपासणीदरम्यान आढळल्या. त्यानंतर एफडीएच्या पथकाने अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत संबंधित चारही आस्थापनांचे लायसन्स तत्काळ निलंबित केलं.
यापूर्वीही FDA कडून मुंबईत कारवाई
अवघ्या 2-3 दिवसांपूर्वीही मुंबईत एफडीएकडून मोठी कारवाई करण्यात आली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संबंधित तीन अन्न आस्थापनांवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली होती. परमीट रूम, पॅव्हिलियन आणि मेडिटेरियन या तीन अन्न आस्थापनांमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आलं होतं. त्यानंतर एफडीएने त्यांचे FSSAI परवाने निलंबित केले होते. तर आज पुन्हा एफडीने मुंबईतील विविध भागांतील आस्थापनांवर कारवाईचा दट्टा उगारल्याने अन्न आस्थापनांमध्ये स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याचे दिसत आहे.
Leave a Reply