
मराठी कलाविश्वातील अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने नुकतीच चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. तेजस्विनीने तिच्या आयुष्यातील नव्या आणि खास अध्यायाची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. आई झाल्यानंतर तिने तिच्या बेबी शॉवरचे काही सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंसोबतच कॅप्शनमध्ये तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तेजस्विनीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिच्या आयुष्यातील हा खास क्षण अगदी सुंदर पद्धतीने टिपलेला दिसतो. बेबी शॉवपच्या या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाचा आनंद आणि उत्साह स्पष्टपण जाणवतोय. कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींसोबत तिने हा आनंद साजरा केला.
या फोटोंसोबत तिने लिहिलं, 'फक्त आम्ही दोघं.. आणि आमच्यात बहरत असलेली एक छोटीशी प्रेमकहाणी. हा दिवस आमच्या प्रेमाचा, कुटुंबाचा आणि आमच्या आयुष्यात येणाऱ्या छोट्या जीवाचा उत्सव होता. या फोटोंकडे आता पाहतना एक वेगळीच भावना जाणवत आहे.'
'त्यावेळी मी आणि माझा जोडीदार आमच्या छोट्या मुलाची वाट पाहत होतो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या या बाळामुळे आमच्या हृदयात किती मोठा बदल होणार आहे, याची आम्हाला तेव्हा कल्पनाही नव्हती. दोन ते तीन होण्यापर्यंतचा प्रवास.. आमच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर अध्याय', असं म्हणत तेजस्विनीने तिच्या मातृत्वाच्या नव्या प्रवासाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.
तेजस्विनीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि मनोरंजन क्षेत्रातील तिच्या मित्रमैत्रिणींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तेजस्विनीने शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी डिसेंबर 2025 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या आठ महिन्यांतच दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.




Leave a Reply