
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा तिढा अद्याप कायम आहे. शिवसेनाचा कायदेशीर वारस कोण यासाठी सुप्रीम युक्तीवाद सुरू आहे. गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या सेनेने हातघाईची लढाई केली. ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी किल्ला लढवला. अखेरच्या सत्रात त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाविषयी मोठा दावा केला. उद्धव सेनेला जर चिन्हं मिळणार नसेल तर ते गोठवण्याची विनंती केली. या सुनावणीला एकदम कलाटणी मिळाली. आजपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने युक्तीवाद सुरू होईल. कालच शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारत दिल्लीत हजर झाले. तर गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे एका खासगी कार्यक्रमानिमित्त मुंबईत दाखल झाले. तेव्हा त्यांच्याशी शिवसेनेच्या मुद्दावर त्यांनी चर्चा केल्याचे समोर येत आहे.
एकनाथ शिंदे दिल्लीत तळ ठोकून
काल तातडीने एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले. पक्ष आणि चिन्ह यांच्या सुनावणीअगोदर त्यांनी त्यांच्या कायदेतज्ज्ञांशी, विधीज्ञांशी चर्चा केली. 2022 नंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र पक्ष म्हणून मिळवलेला जनाधार आणि त्यानंतर पुन्हा उद्धव सेनेचे सहा खासदार तंबूत आल्यानंतर शिंदेंचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. पण पक्षाच्या मालकीचा कायदेशीर पेच वाढलेला आहे. काल माध्यमांशी बोलताना आजपासून शिवसेनेच्या मुद्दावर सुनावणी होत आहे, त्याचा आढावा घेण्यासाठी आल्याचे आणि इतर कामांची माहिती त्यांनी दिली. बाळासाहेबांना धनुष्यबाण हा प्रिय होता. ती गोठवण्याची मागणी दुर्दैवी असल्याची प्रतिक्रियाही शिंदे यांनी माध्यमांना दिली.
आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष
उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. घटनात्मक तरतूदी डावलून एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह देण्यावर तसेच राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष या दोन्ही बाबी पूर्णपणे वेगळे असल्याचा युक्तीवाद त्यांनी केला होता. त्यावर शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. सिब्बल यांनी वकील म्हणून या बाबी मांडल्या. पक्षाची एक घटना आहे. देशाची घटना आहे. लोकशाही आहे. निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. या सर्व गोष्टी सर्वांसमोर आहेत. शिवसेनेच्या वतीने या सर्व मुद्यांना उत्तर देण्यात येईल असे शिंदे म्हणाले. तर काल माध्यमांशी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली. उद्यापासून शिवसेना बाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालय सुरू होत आहे. आमची भूमिका देखील उद्या आम्ही कोर्टासमोर मांडणार आहोत. वकील कोर्टाकडे आमची कागद पत्र दाखवातील. प्रसार माध्यमांनी ही आमची भूमिका सर्व सामान्यांसमोर ठेवावी, असे सामंत म्हणाले.
Leave a Reply