
Ram Kapoor: ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता राम कपूरने त्याच्या वडिलांच्या निधनाबाबत केलेल्या एका भावनिक खुलाशाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुःख, पोकळी आणि आठवणी या भावना स्वाभाविक मानल्या जातात. मात्र, राम कपूरने वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला खुश आणि सुटल्यासारखं का वाटलं, यामागची वेदनादायी कहाणी सांगितली आहे. त्याच्या या वक्तव्याचा अर्थ मृत्यूचा आनंद असा नसून, दीर्घकाळ कॅन्सरच्या वेदना सहन करणाऱ्या वडिलांची यातून सुटका झाल्याचा दिलासा असल्याचं त्याने स्पष्ट केलं.
वडिलांना झालेला प्रचंड त्रास
राम कपूरने नयनदीप रक्षित यांना नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वडिलांच्या शेवटच्या दिवसांबद्दल मन मोकळं केलं. त्यावेळी वडिलांना कॅन्सरमुळे प्रचंड त्रास होत असल्याचं त्याने सांगितलं. कधी त्यांना तीव्र वेदना होत, तर कधी त्यांना भास होत होते. वडिलांना अशा अवस्थेत पाहणं त्याच्यासाठी अत्यंत कठीण होतं. मात्र, त्या काळात परिस्थितीचा विचार करण्यासाठीही त्याच्याकडे वेळ नव्हता. तो केवळ वडिलांच्या गरजा पूर्ण करण्यावर आणि त्यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांच्यासोबत राहण्यावर लक्ष केंद्रित करत होता.
मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला
“कर्करोगाने मरणं हा एक खूप वाईट मार्ग आहे. तो खरंच खूप भयंकर आजार आहे. कधीकधी त्यांना तीव्र वेदना होत, तर कधी त्यांना भास व्हायचे. मला इतर कोणत्याच गोष्टींचा विचार करायला वेळच मिळाला नाही. वडिलांचं निधन होईपर्यंत मी फक्त त्यांच्यासाठी जे करणं आवश्यक होतं, ते करत होतो. नंतर मला कळलं की त्या अनुभवातून मी किती काही शिकलो आहे. ही माझ्या आयुष्यात घडलेल्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे. कारण मी माझ्या वडिलांना त्यांची खरी इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत केली. प्रत्येकजण राजासारखं जगतो किंवा राजासारखं जगण्याचा प्रयत्न करतो. त्यांचं राजासारखं निधन झालं. त्यांनी हे जग त्यांच्या अटींवर सोडलं आणि तसं करण्यास मी त्यांनी मदत केली”, अशा शब्दांत रामने भावना व्यक्त केल्या.
रामने सांगितलं की, त्याचे वडील आयुष्यभर आपल्या पद्धतीने जगले आणि अखेरच्या क्षणीही त्यांना आपल्या अटींवर मृत्यू स्वीकारायचा होता. मुलगा म्हणून त्याने त्यांच्या या इच्छेचा आदर केला. वडिलांच्या निधनानंतर मात्र त्याला जाणवलं की, या संपूर्ण अनुभवाने त्याच्या आयुष्याकडे आणि मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे.
“वडिलांच्या निधनाने प्रचंड आनंद झाला”
याविषयी तो पुढे म्हणाला, “प्रत्येकजण असा जगतो जणू काही ते कधीच मरणार नाहीत. ते आपल्या मृत्यूविषयी कुटुंबातील सदस्यांशी बोलतसुद्धा नाहीत. माझं म्हणणं आहे की, तुम्ही त्यावर बोला, चर्चा करा. तुमच्या मृत्यूपत्राचं, तुमच्या मालमत्तेचं नियोजन करा. मृत्यू कधी ना कधी येणारच आहे, मग तुम्ही त्याकडे दुर्लक्ष का करत आहात. मला माझ्या वडिलांच्या वेदना संपल्याचा प्रचंड आनंद झाला होता. त्यामुळे त्या प्रक्रियेत मला मृत्यूचा आनंदच होत होता. मी मृत्यूकडे पाहून हसत होतो. त्यामुळे आता माझ्यासाठी ही एक गंमतच आहे. मी एका मरणासन्न माणसाला मदत केली, त्यामुळे मी काही चुकीचं केलं असं मला वाटत नाही. म्हणून मला याचा कोणताही पश्चात्ताप नाही.” राम कपूरच्या या कबुलीमुळे मृत्यू, कुटुंबीयांचं भावनिक नातं आणि दीर्घ आजाराच्या काळातील मानसिक संघर्ष यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
Leave a Reply