
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांना झटक्यावर झटके देणं सुरू केलं आहे. आधी सहा खासदारांनी फोडल्यानंतर आता मातोश्रीतील विश्वासू माणूस असलेल्या सचिन अहिर (Sachin Ahir) यांना शिंदे यांनी फोडलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खासदार फुटले म्हणून या खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे गेले होते. मतदारसंघातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हा तीन दिवसांचा दौरा आयोजित केला होता. पण या तीन दिवसातच मोठा गेम फिरला. आपल्या माघारी काय चाललंय हे उद्धव ठाकरेंनाही कळलं नाही. एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली अन् ठाकरेंच्या पक्षात मोठा राजकीय भूकंप झाला.
सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांना आज सकाळी संपर्क साधून पक्ष सोडणार असल्याचं सांगितलं होतं. आदित्य ठाकरे यांनी अहिर यांना थांबवण्याचा प्रयत्नही केला. मात्र अहिर आपल्या भूमिकेवर ठाम होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पक्ष सोडल्यानंतर सचिन अहिर यांनी भारतीय कामगार सेना आणि बेस्ट कर्मचारी सेनेच्या पदावरून राजीनामा दिला आहे. कामगार वर्गात अहिर यांची मोठी पकड होती. त्यामुळे अहिर फुटल्याने ठाकरे गटासाठी मोठा झटका मानला जात आहे.
गेल्या 3 दिवसांपासून सचिन अहिर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते. तिघांचे फोनवर बोलणं सुरू होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिर यांनी शिंदे यांची भेटही घेतल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे मराठवाडा आणि विदर्भाच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर गेलेले असतानाच इकडे शिंदे यांनी अहिर यांच्याशी संपर्क साधून त्यांचं मन वळवलं. त्यात त्यांना यश आलं आणि आज अहिर यांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केला आहे.
वैयक्तिक कारणामुळे…
पक्ष सोडल्यानंतर वैयक्तिक राजकीय भूमिका ही घेतली आहे, असं मत सचिन अहिर यांनी दिली आहे. तर सचिन अहिर यांनी उपसभापतीपदाचा फॉर्म भरल्याने पुढील दोन वर्षाकरिता उपसभापती पद हे सचिन अहिर यांच्याकडे असणार आहे.
आणखी प्रवेश होणार
दरम्यान, सचिन अहिर यांच्यासोबत वरळीतील अनेक कार्यकर्ते शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. 2019 ला सचिन अहिर यांच्यासोबत आलेले पदाधिकारी ठाकरेंना सोडून शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. ठराविक पदाधिकाऱ्यांचा आज प्रवेश होणार आहे. इतर कार्यकर्त्यांच्या प्रवेशानंतर बाकी कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे, असं सांगितलं जात आहे.
Leave a Reply