
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सध्या युक्रेन दौऱ्यावर आहेत. काल राजधानी किवमध्ये त्यांनी रशियन तेल खरेदीच्या मुद्यावर भारताची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. किवमध्ये एका युक्रेनी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, “कुठला देश तेल, खनिजं, धातू खरेदी करतोय म्हणून किंवा खरेदी थांबवली म्हणून रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघणार नाही. हा विषय चर्चा आणि कूटनितीच्या माध्यमातूनच सुटेल” भारत रशियाकडून कच्चा तेलाची खरेदी सुरुच ठेवणार का? एका युक्रेनी पत्रकारान जयशंकर यांना हा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं.आपल्या खास शैलीत जयशंकर यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं.
“तुमच्या प्रश्नामागचं कारण मी समजू शकतो. पण 1 अब्ज 40 कोटी लोकांना तेल उपलब्ध करुन देण्याचं आव्हान सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. खासकरुन सध्या जगात एनर्जी सेक्टरची स्थिती खूप गंभीर आहे” असं जयशंकर म्हणाले. भारताची बाजू मांडताना एस जयशंकर म्हणाले की, “मी म्हणीन ही एक अशी गोष्ट आहे, ज्यात युक्रेनची सुद्धा एका बाजू आहे, त्याचा आम्ही आदर करतो. पण आमचा एक दृष्टीकोन आहे. मला अपेक्षा आहे की, दुसरेही याचा आदर करतील” “मला असं म्हणायचय की, या लढाईला पाच वर्ष झालीयत. कुठला देश तेल, एल्युमिनियम, मिनरल, मेटल किंवा खत खरेदी करतो किंवा नाही करत म्हणून हे युद्ध संपणार नाहीय. या संघर्षावर चर्चा आणि कूटनितीच्या माध्यमातूनच उत्तर मिळू शकतं. म्हणून आम्ही अशा प्रयत्नांना पाठबळ देऊ” असं जयशंकर म्हणाले.
मोदींच्या वक्तव्याची आठवण करुन दिली
एस. जयशंकर यांनी गुरुवारी किवमध्ये युक्रेनी परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांच्यासोबत व्यापक चर्चा केली. रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी भारत कुठल्याही प्रकारची मदत करायला तयार आहे असं जयशंकर यांनी सांगितलं. सिबिहा यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना जयशंकर यांनी सांगितलं की, “हा युद्धाचा काळ नाही. युद्धाच्या मैदानातून तोडगा निघणार नाही हे भारताचं पहिल्यापासूनच मत आहे” दोन दिवसांपूर्वीच बिश्केकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शंघाय सहकार्य संघटना शिखर परिषदेच्या बैठकीत व्लादीमीर पुतिन यांची भेट घेतली होती. त्यावेळी अंतहीन युद्धाच्या जागी युद्ध संपवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे असं मोदी म्हणालेले. त्याची जयशंकर यांनी आठवण करुन दिली.
Leave a Reply