
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि विनायक राऊत यांनी शास्त्रीनगर रुग्णालयाला भेट दिली.
यावेळी दोन्ही नेत्यांनी मारहाण झालेल्या डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. डॉक्टरांवरील हल्ल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली. आरोपीवर त्वरित कारवाई झाली नाही, तर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.
दरम्यान, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून, डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, दोषींवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Leave a Reply