
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच गर्दी केली आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये तिसऱ्या श्रावणी सोमवारला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे साक्षात दर्शन घडवणारे हे पवित्र स्थान श्रावणातील या विशेष दिवशी भाविकांनी फुलून गेले आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे, तर देशाच्या विविध भागांतून भाविक त्र्यंबकेश्वरच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल झाले आहेत. आजच्या दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या 20 ते 40 किलोमीटरच्या प्रदक्षिणेलाही विशेष महत्त्व आहे. ही प्रदक्षिणा पूर्ण केल्याने पुण्यप्राप्ती होते आणि दुःखांचा नाश होतो, अशी श्रद्धा आहे. हजारो भाविक या पवित्र प्रदक्षिणेसाठीही उपस्थित आहेत.
प्रशासनाच्या वतीने आणि त्र्यंबकेश्वर विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांसाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस बंदोबस्त, होमगार्ड आणि स्थानिक स्वयंसेवक मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या सेवेत आहेत. दिवसभरात सुमारे दोन लाख भाविक त्र्यंबकेश्वरला भेट देतील असा अंदाज आहे.
Leave a Reply