
MPSC पेपर लीक प्रकरणात संशयित आरोपी ऋतुजा पाटील यांचे वडील अमृत पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अमृत पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या वतीने अमृत पाटील यांना २०२३-२४ या वर्षासाठी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, MPSC औषध निरीक्षक पदाच्या पेपर लीक प्रकरणात अमृत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणात संशयित मुख्य आरोपी म्हणून ऋतुजा पाटील यांचे नाव समोर आले असून, ऋतुजा पाटील सध्या फरार असल्याची माहिती आहे. त्यांच्या वडीलांना पोलिसांनी अटक केली आहे.
12 लाखांत पेपर फोडला
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी अमृत पाटील यांनी एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांशी संगनमत केले. त्यासाठी या तीन अधिकाऱ्यांना 12 लाख रुपये देण्यात येणार होते. त्यातील 5 लाख रुपये त्यांनी अगोदर अधिकाऱ्यांना दिले. 22 मार्च रोजी ही परीक्षा झाली. त्यातील 40 हजार प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्या प्रेमामुळे पाणी फेरले गेले.
लव्ह स्टोरी ते हेट स्टोरी
या पेपरफुटीमागील एक लव्ह अँगलही समोर आला आहे. अमृत पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील हिचे गौरव उर्फ लोकेश पाटील याच्याशी प्रेमसंबंध समोर आले आहे. अमृत पाटील यांनी कौटिल अकादमीच्या प्रवीण पाटील या दलालामार्फत 22 मार्चच्या परीक्षेपूर्वी मुलीसाठी प्रश्नपत्रिका मिळवली. प्रेमापोटी तिने हा पेपर प्रियकर गौरव याला पाठवला. निकाल जाहीर झाला. त्यात ऋतुजा ही गुणतालिकेत राज्यात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. ऋतुजा पाटील आता आपल्यापासून दूर जाईल. ती अधिकारी होईल या भीतीने गौरवने थेट एमपीएससीकडे थेट पेपरफुटीची तक्रार दाखल केली.
दबाव येताच वेड्याचे सोंग
तक्रार दाखल झाल्याची वार्ता एमपीएससीतील अधिकाऱ्यांना वेळीच मिळाली. त्यांनी गौरव याच्यावर दबाव वाढवला. मग दुसऱ्या दिवशी गौरवने परीक्षेची पुन्हा संधी मिळावी यासाठी आपण मुद्दाम असा बनाव रचल्याचा कांगावा केला. पण चौकशीची चक्रे फिरली होती. पोलिसांनी याप्रकरणात तक्रारदार गौरव पाटील याच्यासह अव्वर सचिव, इतर दोन अधिकारी, शिक्षकासह 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तर ऋतुजा पाटील अद्याप फरार आहे. तिला पोलिसांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. पेपरफुटीला आळा घालण्यात पुन्हा एकदा अपयश आल्याचे या प्रकरणात समोर आले आहे. NEET, TET आणि आता औषध निरीक्षकाचाही पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे.
Leave a Reply