
गौतम भैसाणे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेले मंत्री नरहरी झिरवळ यांचे विशेष कार्य अधिकारी गणेश देवरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही असा दाव गणेश देवरे यांनी केला आहे. आपण गौरव पाटील यांचा भाडेकरू आहे, हे खरं; मात्र या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सुद्धा देवरे यांनी केली. तर यापूर्वी टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी सुद्धा त्यांचा आणि मंत्रालयाचा या पेपरफुटीशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला.
पेपरफुटीसोबत दुरान्वयेही संबंध नाही
गौरव पाटील यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहणे हा केवळ योगायोग आहे. या प्रकरणाशी माझा दूरान्वयेही संबंध नाही, असा खुलासा गणेश देवरे यांनी केला आहे. माझी बदनामी करणार्यांना कायदेशीर नोटीस बजावणार असा इशाराही देवरे यांनी दिला. मी दोषी नसल्याने कुठेही गेलेलो नाही. नंदुरबारमधील माझ्या घरीच असल्याचा दावा त्यांनी केला. गौरव पाटील आरोपी आहे आणि मी त्यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहतो, यात माझा काय दोष? असा सवाल त्यांनी विचारला. या प्रकरणाची गेल्या अनेक दिवसांपासून चौकशी सुरू आहे. मी सहभागी असतो तर नंदुरबारमध्ये थांबलो असतो का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
मंत्री नरहरी झिरवळ यांची प्रतिक्रिया काय?
मंत्री नरहरी झिरवळ यांनी याविषयी टीव्ही 9 मराठीशी बोलताना पेपरफुटीशी कुठलाच संबंध नसल्याचे म्हटले आहे. मंत्रालयाचा, कर्मचाऱ्यांचाही संबंध नाही. कारण सर्व विभागातील भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात येते. त्यामुळे या प्रक्रियेशी आपल्या खात्याचा आणि आपला काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया मंत्री झिरवळ यांनी दिली.
एकूण 7 जणांना अटक
अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक (गट-ब) परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये MPSC च्या अधिकाऱ्यांसह लाभार्थी परीक्षार्थी ऋतुजा पाटील हिला सुद्धा अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात 7 जणांना अटक केली आहे. एमपीएससीचे सहसचिव, अवर सचिव अभिजित लेंडवे, सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, गोपाल मराठे यांच्यासह तीन अधिकाऱ्यांना अगोदरच अटक करण्यात आली आहे. कौटिल्य अकॅडमीचा संचालक प्रवीण पाटील, अमृत पाटील आणि गौरव पाटील यांनाही अगोदरच अटक करण्यात आली आहे.
Leave a Reply