
Kumar Sanu: बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉनशीही सामना झाला होता. दाऊद इब्राहिम, अबू सालेम यांच्यासाठी परफॉर्म करायला ते पोहोचले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. आपण दाऊदसाठी परफॉर्म करायला जातोय, हे त्यांना सुरुवातीला माहितच नव्हतं. वर्तमानपत्रांमध्ये फोटो छापल्यानंतर त्यांना परिस्थितीचं गांभीर्य समजलं होतं. तर दुसऱ्या एका घटनेत ते अबू सालेमसाठी परफॉर्म करण्यासाठी दुबईला गेले होते. यावेळी त्यांना पोलिसांनी त्यांना रोखलंसुद्धा होतं. तरीसुद्धा ते गाणं गायला तिथे गेले होते.
कुमार सानू यांचा खुलासा
‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत कुमार सानू यांनी सांगितलं की, एकदा एका व्यक्तीने माझ्याकडे खंडणी मागितली होती. मी त्याला नकार दिला होता. त्याऐवजी मी तुझ्यासाठी गाणं गाऊ शकतो, परफॉर्म करू शकतो, अशी ऑफर त्यांनी त्या व्यक्तीला दिली होती. इतकंच नव्हे तर ते एकदा गँगस्टर अबू सालेमच्या शोमध्ये गाणं गाण्यासाठी दुबईला गेले होते. पोलिसांना जेव्हा याबद्दल समजलं तेव्हा त्यांनी कुमार सानू यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला होता. पण तरीही त्यांनी पोलिसांचं ऐकलं नाही.
पोलिसांनी दिलेला इशारा
“पोलीस ठाण्यातून मला फोन आला. त्यांनी विचारलं, तुम्ही अबू सालेमच्या शोमध्ये परफॉर्म करण्यासाठी जात आहात का? मी म्हटलं होय, जातोय. आता काय करू? तेव्हा ते म्हणाले, तुम्ही तिथे नाही गेलं पाहिजे. मी म्हटलं, ठीक आहे, मी जाणार नाही, पण तुम्ही मला सिक्युरिटी द्या. जर त्याने मला गोळ्या झाडल्या, तर मी काय करू? त्यासाठी तुम्ही मला सुरक्षा द्या. पोलिसांनी मला थेट अटकेचाच इशारा दिला होता. तुम्ही तिथे गेलात तर आम्ही तुम्हाला अटक करू. तेव्हा मीसुद्धा त्यांना सांगितलं की, हे पहा.. एकतर तुम्ही मला सुरक्षा द्या किंवा आश्वासन द्या की मला काही होणार नाही. मी एक गायक आहे आणि गाणं हे माझं काम आहे. त्यामुळे नाईलाजाने मला तिथे जावं लागतंय”, असा किस्सा त्यांनी सांगितला.
पोलिसांच्या इशाऱ्यानंतरही कुमार सानू दुबईला गेले आणि तिथे अबू सालेमसाठी परफॉर्म करून आले. “मी दुबईला गेलो, परफॉर्म केलं आणि हॉटेलवर परत येऊन माझं सामान घेतलं. तिथून सुखरुप घरी परत आलो”, असं कुमार सानू यांनी स्पष्ट केलं.
Leave a Reply