
कडक उन्हाळ्यानंतर आता देशातील विविध राज्यांमध्ये वातावरणात बदल जाणवत आहे. आता हवामान विभागाच्या माहितीनुसार, 4 जून 2026 रोजी देशाच्या हवामानात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. IMD ने दिलेल्या माहितीनुसार उद्या केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची दाट शक्यता आहे, तर दुसरीकडे उत्तर आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये धुळीच्या वादळासह पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी देशाच्या कोणत्या राज्यात हवामान कसे असेल ते जाणून घेऊयात.
अनेक भागात पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या देशाच्या अनेक भागात वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात घट होऊ शकते. राजधानी दिल्ली आणि आसपासच्या NCR भागासाठी 4 ते 6 जूनदरम्यान मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळू शकतो. तर उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातील बहुतांश भागांमध्ये गुरुवारी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
उत्तर भारतातील काही भागात या काळात ताशी 90 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. दिल्ली आणि आसपासच्या NCR भागात 4 जून रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय दुपारी किंवा संध्याकाळी मेघगर्जना, धुळीचे वादळ आणि हलका पाऊस पडू शकतो. तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात पश्चिमी विक्षोभ आणि स्थानिक हवामान बदलांच्या प्रभावामुळे NCR मधील हवामान सामान्यपेक्षा अधिक अनुकूल राहील.
मध्य भारतासह राजस्थानमध्ये धुळीचे वादळ आणि गारपीटीची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-NCR मध्ये या काळात वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 60 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. दिल्लीमध्ये कमाल तापमान 38°C ते 40°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा आणि पूर्व राजस्थानमध्ये काही ठिकाणी गारांच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने पूर्व आणि पश्चिम मध्य प्रदेशातही 4 जून रोजी गारपिटीची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच पश्चिम राजस्थानमध्ये धुळीचे वादळ येण्याचा अंदाज आहे. पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भातही ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कुठे-कुठे मुसळधार पावसाची शक्यता?
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 4 जून 2026 रोजी देशातील सुमारे 12 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे केरळ आणि माहे येथे 4 जून रोजी काही ठिकाणी 7 ते 20 सेंटीमीटरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय किनारी कर्नाटक, उत्तर अंतर्गत कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल आणि लक्षद्वीपच्या काही भागांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि गोव्यातील काही भागांतही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबईत हवामान बदलणार
IMD ने दिलेल्या माहितीनुसार 4 जूनपासून ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील हवामानात स्पष्ट बदल दिसू लागेल. विविध भागांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोका ओळखून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Leave a Reply